आता कारागृहातील कैद्यांनाही भेटीसाठी एकांत मिळणार, जोडीदाराशी शरीरसंबंध ठेवता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:29 PM2022-10-12T12:29:30+5:302022-10-12T12:30:05+5:30
Punjab : तुरुंगामध्ये दीर्घ कालावधीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना क्वचितच भेटण्याची संधी मिळत असते.दरम्यान, तुरुंगातील कैद्यांनाही आता त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवण्याची सुविधा मिळणार आहे.
चंडीगड - तुरुंगामध्ये दीर्घ कालावधीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना क्वचितच भेटण्याची संधी मिळत असते. त्यामुळे या कैद्यांच्या जीवनात एकाकीपणा आलेला असतो, तसेच त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. दरम्यान, तुरुंगातील कैद्यांनाही आता त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच या एकांतात शारीरिक संबंध ठेवण्याचीही परवानगी मिळणार आहे. अशी व्यवस्था करणारं पंजाब हे पहिलं राज्य ठरलं आहे. पंजाबमधील तुरुंगात असलेल्या कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवता येणार आहे.
तुरुंगामध्ये अनेक कैदी हे एकाकी जीवन जगावे लागत असलेल्या तणावाखाली असतात. तसेच त्यांच्या मानसिक स्थितीवरही या नैराश्याचा परिणाम होत असतो. याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गोईंदवाल कारागृहातील गुरजित या कैद्याला पहिल्यांदा या सुविधेचा लाभ मिळाला आहे. तो हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याने सरकारचे आभार मानले आहेत. माझी पत्नी जेव्हा मला भेटायला आली तेव्हा आम्ही एका खोलीत एकांतामध्ये काही वेळ घालवला, खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
मात्र या सुविधेचा लाभ हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि धोकादायक कैद्यांना मिळणार नाही. सरकारने ही सुविधा देताना नमूद केलेल्या नियमांमध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. धोकादायक कैदी, गुंड आणि दहशतवादी यांना ही सुविधा दिली जाणार नाही. तसेच लैंगिक शोषण, बलात्कार आदी गुन्ह्यातील आरोपींनाही ही सवलत मिळणार नाही. त्याशिवाय ज्या कैद्यांना टीबी, एचआयव्हीसारखे गंभीर आजार आहेत, त्यांनाही ही सवलत मिळणार नाही.