आता रामसेतूसंदर्भात ISRO च्या वैज्ञानिकांना मोठं यश, दिली आनंदाची बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:39 PM2024-07-10T22:39:03+5:302024-07-10T22:39:54+5:30
वैज्ञानिकांनी ICESat-2 च्या ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा 10 मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे.
रामायणातील रामसेतूचा उल्लेख आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. प्रभू रामचंद्रांनी माता सिता यांना रावणाच्या कैदेतून परत आणण्यासाठी वानर सेनेच्या मदतीने रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत हा सेतू बांधला होता. आता याच राम सेतूसंदर्भात इस्रोच्या शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांनी राम सेतूचा, ज्याला ॲडम्स ब्रिज असेही म्हटले जाते, तपशीलवार नकाशा तयार केला आहे. यासाठी इस्रोने अमेरिकन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट नासाच्या उपग्रहांचा डेटा वापरला आहे.
वैज्ञानिकांनी ICESat-2 च्या ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा 10 मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे. या मॅपमधून धनुषकोडीपासून ते तलाईमन्नारपर्यंतच्या पुलाची माहिती मिळते. यात त्याचा 99.98 टक्के भाग पाण्यात बुडालेला आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या उपग्रहासह सुसज्ज असलेल्या लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून बुडालेल्या रिजच्या संपूर्ण लांबीचा हाय रिझोल्यूशन मॅप तयार केला आहे.
गिरिबाबू दंडबथुला यांच्या नेतृत्वाखाली रिसर्च टीमने 11 नॅरो चॅनल शोधून काढले आहेत. जे मन्नारचे आखात आणि पाल्कच्या सामुद्रधुनीदरम्यानच्या पाण्याच्या प्रवाहात महत्त्वाची भूमिका बजावतात.
संशोधकांनी म्हटले आहे की, या पुलाचा 99.98 टक्के हिस्सा पाण्यात बुडालेला आहे. यामुळे जहाजाच्या सहाय्याने सर्व्हे करणे शक्य नव्हते. रामेश्वरम येथील मंदिरांच्या शिलालेखांवरून समजते की, हा पूल 1480 पर्यंत समुद्रातील पाण्यावर होता. मात्र, नंतर एक चक्रीवादळ आल्याने तो बुडाला.