आता लग्नपत्रिकेवरही ‘बंटोगे तो कटोगे' नारा, PM मोदी आणि CM योगींचा फोटोही छापला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 06:13 PM2024-11-10T18:13:09+5:302024-11-10T18:17:17+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बंटोगे तो कटोगे’ ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नाही, तर ही घोषणा आता गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा आखाडा सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबरकसून या आखाड्यात उतरले आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विवीध प्रकारची आश्वासने आणि घोषणा देत आहेत. यातच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बंटोगे तो कटोगे’ ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नाही, तर ही घोषणा आता गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे.
गुजरातमधील भावनगर येथील एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या भावाच्या लग्न पत्रिकेवर हा नारा अथवा ही घोषणा छापली आहे. याशिवाय कार्डवर पीएम मोदी आणि सीएम योगींच्या फोटोसह स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी हे लग्न होणार आहे. या अनोख्या कार्डमुळे हे लग्न चर्चेत आले आहे.
महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरियाणाच्या निवडणुकीदरम्यान हिंदूंना एकत्र करण्यासाठी ‘बंटोगे तो कटोगे’ अशी घोषणा दिला होता. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही या घोषणेची चर्चा होत आहे. ही घोषणा लग्नपत्रिकेवर छापणाऱ्या कार्यकर्त्याने यासंदर्भात आपले मतही व्यक्त केले आहे. आज तकच्या वृत्तानुसार, "लोकांना जागरूक करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींचा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लग्न पत्रिकेवर ही घोषणा छापल्याचे त्याने म्हटले आहे.
तत्पूर्वी, भाजप नेते योगी आदित्यनाथ आपल्या रॅलींमध्ये 'बाटेंगे तो कटेंगे'चा नारा देत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’, असा एकतेचा संदेश देत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच, जाती-जातीत भांडण लावणे हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. SC, ST आणि OBC समाजाची प्रगती व्हावी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा, असे त्यांना वाटत नाही. लक्षात असू द्या, 'एक है, तो सेफ है' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.