आता स्मारकेच आहेत हुतात्मा होण्याचा मार्गावर

By admin | Published: September 7, 2014 10:27 PM2014-09-07T22:27:55+5:302014-09-07T23:21:42+5:30

शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : मातृभूमीसाठी प्राणाहुती देणाऱ्यांची उपेक्षा

Now there are monuments on the path of martyrdom | आता स्मारकेच आहेत हुतात्मा होण्याचा मार्गावर

आता स्मारकेच आहेत हुतात्मा होण्याचा मार्गावर

Next

कोरेगाव : जुलमी राज्यकर्त्यांच्या तावडीतून मातृभूमीला सोडविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचा त्याग व बलिदानाची आठवण भावी पिढीला सदैव राहावी, यासाठी महाराष्ट्रात २०६ हुतात्मा स्मारकांची निर्मिती करण्यात आली; पण शासनाने या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने आज राज्यातील बहुतांश स्मारके हुतात्मा होण्याच्या मार्गावर आहेत.
स्वातंत्र्य सैनिकांचे हौतात्म्य चळवळीस प्रेरणादायी ठरले. गोवा मुक्ती संग्रामात ज्या शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या चिरंतन स्मृतींसाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी राज्यात या हुतात्म्यांची स्मारके उभारली. यातील बरीच स्मारके शासनाच्या दुर्लक्षामुळे हुतात्म्यांच्या शौर्यकथा सांगण्याऐवजी बकाल बनत आहेत.
जिल्ह्यातील बहुतेक स्मारके दुरुस्तीअभावी पडून आहेत. २० जुलै १९८३ च्या शासकीय आदेशानुसार हुतात्मा स्मारकांची देखभाल व परीक्षणाचे काम ग्रामीण भागात जिल्हा परिषद व शहरी भागात महापालिका किंवा नगरपालिका यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मात्र स्मारकांच्या दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष नाही.
याच अध्यादेशाद्वारे शासनाने जिल्हास्तरावर जिल्हा हुतात्मा स्मारक समितीची स्थापना केली असून स्मारकांची देखभाल व दुरुस्तीबाबतचे परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतात. जिल्ह्यातील दोन-तीन स्मारके सोडली तर बाकींच्या स्मारकांची दुरवस्था आहे. सध्या वर्धनगड येथील हुतात्मा स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विद्युत उपकरणे व इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. काही स्मारकांच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. तसेच प्रवेशद्वारासमोरील बांधकाम उखडले असून सभोवताली पत्रे तुटून पडले आहेत.
याबाबत शासनाकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्मारके मोडकळीस आली आहेत. दुरुस्तीसाठी आलेल्या निधीचा वापर झाल्याचे दिसत नाही.
मुक्तीसंग्रामात प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचीही हेळसांड शासनाकडून होत आहे. जिल्ह्यातील बरेच जण स्वातंत्र्यसैनिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांनी वास्तविक शासनाच्या सवलतींसाठी लढ्यात भाग घेतला नव्हता, तर मातृभूमीविषयीच्या प्रेमापोटी स्वत:ला लढ्यात झोकून दिले होते. परंतु शासनाने या योजनांच्या लाभासाठी वेगवेगळे निकष ठेवून स्वातंत्र्यसैनिकांची जणू चेष्टाच केली आहे.
स्वातंत्र्यसैनिकांनाही मागण्यासाठी निवेदने देऊन उपोषण, आंदोलने करावी लागतात हा तर स्वातंत्र्यसैनिकांचा अवमानच
होय. (प्रतिनिधी)

अपवाद फक्त कोरेगावचा...
कोरेगाव शहरात हमरस्त्यावर असलेले हुतात्मा स्मारक हे प्रशासन आणि रोटरी क्लबच्या समन्वयामुळे आज सुस्थितीत आहे. जिल्हा प्रशासनाने केलेले सहकार्य आणि शहरवासियांची आस्था यामुळे या स्मारकाचे रुपडे पालटले आहे. आज विविध कार्यक्रमांसाठी या स्मारक आवाराचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्याची नियमित देखभाल-दुरुस्तीही होते. रोटरी क्लबने स्वतंत्र कर्मचारी नेमल्याने स्मारकाने कात टाकली आहे. प्रशासनाने कोरेगाव पॅटर्नच्या धर्तीवर स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकास साधावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Now there are monuments on the path of martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.