आता १९६२ सारखी परिस्थिती राहिली नाही - अरुण जेटली
By admin | Published: July 1, 2017 02:55 AM2017-07-01T02:55:58+5:302017-07-01T02:55:58+5:30
भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर १९६२च्या युद्धापासून धडा घ्यावा, असे भारताला सांगणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पुन्हा कडक उत्तर दिले आहे. अरुण जेटली म्हणाले की, १९६२ आणि २0१७ या काळात भारत बदलला आहे, हे चीननेही लक्षात ठेवावे. ते म्हणाले की, चीन विस्तारवादी भूमिकेतून अन्य देशांच्या भूमीवर कब्जा करू पाहत आहे. भारत व भुतान यांच्यात संरक्षणविषयक करार आहे. त्यामुळे भारताला चीनच्या या विस्तारवादाची चिंता वाटत आहे.
दोन देशांमध्ये वाढता तणाव पाहून भारताने सिक्किममध्ये सीमेवर ३000 अधिक र्सैनिक तैनात केले आहेत. दोन दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी तिथे घुसखोरी केली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या लष्करी सैनिकांमध्ये धक्काबुक्की व बाचाबाची झाली होती. त्यानंतर लष्करप्रमुख रावत यांनी गुरुवारी त्या भागाचा दौरा केला. त्यानंतर तिथे जादा सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सिक्कीमच्या जवळ वादग्रस्त डोक ला भागात चीनकडून रस्त्याचे काम सुरू असल्याबद्दल भारताने पुन्हा शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली,
चीनने मात्र, भारताने सिक्किममधील भारतीय जवानांना परत बोलवावे, अशी अट त्यांनी घातली आहे. चीनच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, संबंधित पक्षांनी संयम राखण्याची गरज आहे.