तुरूंगात जागा नसल्याने आता मला गोळ्या मारण्याची भाषा करतायेत - कमल हसन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 07:44 AM2017-11-05T07:44:10+5:302017-11-05T07:45:53+5:30
टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात.
चेन्नई - हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून चर्चेत आलेला अभिनेता कमल हसन याने आपल्या विरोधकांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. पण आता तुरूंगातच जागा शिल्लक राहिली नसल्याने ते मला गोळ्या मारून संपवण्याची भाषा करत आहेत अशी खोचक टीका कमल हसनने केली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कमल हसनचं हे वक्तव्य अखिल भारतीय हिंदू महासभेकडून आलेल्या प्रतिक्रियेनंतर आलं आहे. कमल हसन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं अखिल भारतीय हिंदू महासभेने काल म्हटलं. 'कमल हसन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही', असं अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा बोलले आहेत.
कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू दहशतवादावर परखड मत मांडले होते. पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत, पण आताचे हिंदू हिंसेत सहभागी होतात, अशी टीका त्यांनी केली होती. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीकाही त्यांनी लेखात केली होती. एका मासिकासाठी त्यांनी हा लेख लिहीला होता. कमल हसन यांच्या टीकेवरुन वाद निर्माण झाला होता.