आता आझम खान, मेनका गांधींवरही प्रचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 09:28 AM2019-04-16T09:28:50+5:302019-04-16T09:29:45+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम शिवीगाळ केली आहे.
लखनऊ : आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर अनुक्रमे 72 आणि 48 तासांची बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी कडक पाऊले उचलली आहेत. भाजपाच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावरही बंदी आणण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम शिवीगाळ केली आहे. तर आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. यामुळे आझम खान यांच्यावर भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. तर त्यांच्याविरोधात मोठा मोर्चा काढण्याची तयारीही भाजपा करत आहे.
निवडणूक आयोगाने आझम खान यांच्यावर कारवाई करताना 72 तासांची प्रचारबंदी केली आहे. ही बंदी मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. तर मेनका गांधी यांच्यावर 48 तासांची बंदी घालण्यात आली आहे. मेनका यावेळी सुल्तानपूरमधून उमेदवार आहेत.
योगी, मायावतींवरही कारवाई
जातीयवादी विखारी प्रचार करून प्रचाराचे वातावरण कलुषित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी भाजपचे ‘स्टार प्रचारक’ व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व बसपच्या प्रमुख मायावती यांची शब्दांत निर्भत्सना करत, यांच्यावर प्रचारबंदी लागू केली. योगींवरील प्रचारबंदी ७२ तासांची (तीन दिवस) तर मायावतींवरील बंदी ४८ तासांची (दोन दिवस) असेल. बंदी मंगळवार सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल. या काळात त्यांना सभा, मिरवणुका, रोड शोद्वारे प्रचार करता येणार नाही. प्रसिद्धी व समाजमाध्यमांतूनही निवडणुकीशी संबंधित वक्तव्ये करता येणार नाहीत.
मेरठमधील सभेत आदित्यनाथ यांनी मुस्लिमांचा उल्लेख ‘हिरवा विषाणु’ असा केला होता व अलीला नव्हे, तर बजरंगबलीला मते देण्याचे आवाहन केले होते. मायावती यांनी सहारनपूरमध्ये सर्व मुस्लिमांनी या मुस्लीम उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन केले होते. आयोगाने नोटिसा काढताच दोघांनीही सारवासारव करणारी उत्तरे दिली, पण वक्तव्ये केल्याचा इन्कार केला नाही. आयोगाने दोघांच्याही भाषणांचे व्हिडीओ पुन्हा पाहिले व अशी वक्तव्ये केल्याची खात्री करून घेतली.