आता "या" विमानतळांवर लागणार नाही बॅगेला टॅग
By Admin | Published: April 24, 2017 07:16 PM2017-04-24T19:16:13+5:302017-04-24T19:16:13+5:30
आणखी सहा विमानतळावरुन बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्याच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - आणखी सहा विमानतळावरुन बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्याच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
पटना, चेन्नई, गुवाहटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळावरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे. आजपासून आठवडाभर प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग न लावण्याचा प्रयोग सीआयएसएफकडून करण्यात येणार आहे.
30 एप्रिलपर्यंत ह्या सहा विमानतळांवर आठवडाभर प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात येणार नसून याचा परिणाम पाहून पुढील निर्णय आम्ही घेऊ, असे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले. तसेच, जर सर्व सुरक्षतेच्यादृष्टीने समाधानकारक वाटल्यास सहाही विमानतळांवर लवकरच बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्यात येणार नाही, असेही ओ. पी. सिंह म्हणाले.
याआधी 1 एप्रिलपासून देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानतळावरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला होता. आता पटना, चेन्नई, गुवाहटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवर घेतला आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १९९२ पासून आपल्या देशात विमानतळांवर बॅगांना स्टॅम्पिंग टॅग लावण्याची पद्धत सुरू झाली. सीआयएसएफचे जवान बॅगेचा टॅग व स्टॅम्प तपासून प्रवाशांना विमानात बसण्यास पाठवतात. ही पद्धत वेळखाऊ तसेच प्रवाशांना डोकेदुखी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.