Dry Day Rule Delhi : आता दिल्लीत वर्षाला 21 एवजी फक्त 3 ड्राय-डे; जाणून घ्या, हॉटेल-दुकानांसाठीचे नवे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:07 PM2022-01-25T12:07:24+5:302022-01-25T12:10:41+5:30
दिल्ली सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हणण्यात आले आहे की, दारू आणि अफूची दुकाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (15 ऑगस्त) आणि गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला बंद राहतील.
दिल्ली सरकारने (Delhi Government) आपल्या उत्पादन शुल्क धोरणात (New Excise Policy) काही बदल केले आहेत. यानुसार आता ड्राय-डे (Dry Day) ची संख्या कमी करण्यात आली आहे. यापूर्वी येथे वर्षभरात 21 दिवस ड्राय-डे होते. मात्र, आता 3 दिवसच ड्राय-डे असणार आहेत. यासंदर्भात नवा नियमही लागू करण्यात आला आहे.
या दिवशी असतील ड्राय-डे -
दिल्ली सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हणण्यात आले आहे की, दारू आणि अफूची दुकाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (15 ऑगस्त) आणि गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला बंद राहतील.
हॉटेल्स आणि दुकानांसाठी असेल असा नियम -
दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010 (52)च्या तरतुदींनुसार, 2022 मध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मद्यविक्रीला परवानगी नसेल. उत्पादन शुल्क विभागाने म्हटल्याप्रमाणे, एल-15 परवाना असलेले हॉटेल चालक ड्राय-डेच्या दिवशी अतिथींना आपल्या खोल्यांमध्ये दारू देऊ शकतील. याच बरोबर, या तीन ड्राय-डें व्यतिरिक्त सरकार वर्षातील कोणताही दिवस वेळोवेळी 'ड्राय-डे' म्हणून घोषित करू शकते, असेही आदेशात म्हणण्यात आले आहे.
केव्हा लागू करण्यात आले आबकारी धोरण?
दिल्ली सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली. जे 17 नोव्हेंबरपासून लागू झाले आहे. या नव्या उत्पादन शुल्क धोरणामध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. आता सरकारच्या या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत प्रत्येक प्रभागात तीन ते चार दारूची दुकाने सुरू होत आहेत. यापूर्वी असे 79 वॉर्ड होते, जेथे दारूची दुकानं नव्हती.
आधी केव्हा केव्हा असायचा ड्राय-डे?
यापूर्वी होळी, दिवाळी, जन्माष्टमी, मुहर्रम, ईद-उल-जुहा (बकरीद), गुड फ्रायडे, राम नवमी, महावीर जयंती, बुद्ध पैर्णिमा, महर्षि वाल्मीकि जयंती, गुरु नानक जयंती आणि दसऱ्यासह इतर सणांच्या दिवशी ड्राय-डे असायचा.