आता रिक्षाने नव्हे, तर हवाई टॅक्सीने करा प्रवास; मोहालीत होणार देशातील पहिला प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 06:35 AM2024-04-14T06:35:22+5:302024-04-14T06:36:19+5:30
देशातील पहिली हवाई टॅक्सी पंजाबमधील मोहालीमध्ये तयार केली जाणार आहे.
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड: देशातील पहिली हवाई टॅक्सी पंजाबमधील मोहालीमध्ये तयार केली जाणार आहे. अनिवासी भारतीय असलेल्या कुलजित सिंग संधू यांनी हवाई टॅक्सी तयार करण्यासाठी मोहालीमध्ये प्रकल्प स्थापन करण्याबाबत पंजाब सरकारशी चर्चा केली आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हवाई टॅक्सीची निर्मिती करणारे मोहाली हे देशातील पहिले शहर असेल. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग एअरक्राफ्ट (ई-विटोल) ही एक हवाई टॅक्सी आहे. यामुळे प्रदूषणापासून दिलासा तर मिळणार आहेच; पण हेलिकॉप्टरमुळे होणारे ध्वनिप्रदूषणही दूर होणार आहे. ई-विटोलमध्ये ऑटो पायलट मोड असून, त्यात पॅराशूटचीही सोय असणार आहे, असे नलवा एयरो कंपनीचे कुलजित सिंग संधू म्हणाले.
वैशिष्ट्ये - ३५० किमी/तास सरासरी वेग
वजन - १४०० किलो
वहन क्षमता - ७०० किलो
एका चार्जवर ९० मिनिटे प्रवास करता येईल.
६५०० मीटर उंचीपर्यंत उड्डाण करण्यास ही हवाई टॅक्सी सक्षम.