आता १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने टाकावी लागणार भंगारात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 05:05 AM2021-01-17T05:05:31+5:302021-01-17T07:09:31+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नव्या वाहनांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही हे धोरण आणत आहोत.
नवी दिल्ली : तुमच्याकडे १५ वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन असेल, तर ते तुम्हाला लवकरच भंगारात काढावे लागेल, अशी शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीचा एक प्रस्ताव सरकारला सादर केला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नव्या वाहनांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही हे धोरण आणत आहोत. शिवाय जुन्या वाहनांमुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते.
‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज २०२०-२१’ या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी यांनी म्हटले की, आम्ही यासंबंधीचा प्रस्ताव दिला आहे. याला लवकरात लवकर मान्यता मिळेल, अशी मला अपेक्षा आहे. १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या कार, बस आणि ट्रक अशा सर्व व्यावसायिक आणि खाजगी वाहनांना हा नियम लागू राहील. अर्थसंकल्प तोंडावर आलेला असतानाच गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन या धोरणाची घोषणा करू शकतात. यासंबंधीचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेईल. जुनी आणि अधिक प्रदूषण करणारी वाहने भंगारात निघाल्यास अर्थव्यवस्थेला फायदे होतील. गडकरी यांनी सांगितले की, या धोरणाला मान्यता मिळाल्यास भारत वाहन उद्योगाचे केंद्र बनेल. भंगारात निघालेल्या वाहनांचे साहित्य पुनर्प्रक्रिया करून नव्या वाहनांच्या निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते.