आता कोणताही चित्रपट पाहा केवळ २०० रुपयांत; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:09 IST2025-03-08T09:08:43+5:302025-03-08T09:09:15+5:30
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या ऐतिहासिक १६व्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली.

आता कोणताही चित्रपट पाहा केवळ २०० रुपयांत; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा
बेंगळूरु: चित्रपटगृहांत तिकिटाचा दर आता २०० रुपयांहून अधिक असणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी आपल्या ऐतिहासिक १६व्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली. यासोबतच राज्यात कन्नड चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माण केला जाईल. रक्षित शेट्टी आणि ऋषभ शेट्टीसारख्या प्रमुख कानडी अभिनेते व निर्मात्यांनी ओटीटीबाबत तक्रार केली होती. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म कानडी भाषेतील कंटेंट प्रसारित करण्यात टाळाटाळ करतात, असे या कलाकारांचे म्हणणे होते.
सिद्धरामय्या यांनी कन्नड चित्रपट क्षेत्राच्या अडचणी लक्षात घेऊन या भाषिक चित्रपट निर्मितीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा केली. यात औद्योगिक धोरणानुसार दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा चित्रपट क्षेत्रातही दिल्या जातील, अशी हमी त्यांनी दिली. बंगळुरू शहरात अडीच एकर जमिनीवर सरकार व खासगी भागीदारीतून (पीपीपी) मल्टिप्लेक्स मुव्ही थिएटर परिसर विकसित केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कर्नाटकातील नक्षलवादी संपले, एएनएफ विसर्जित कर्नाटक राज्य पूर्णपणे नक्षलमुक्त झाल्याने सरकारने नक्षलविरोधी दल(एएनएफ) विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सायबर गुन्हे विभाग मजबूत करण्याची घोषणा त्यांनी केली.
...तर कठोर कारवाई
राज्याच्या विकासात कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले असून, अशा लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. नक्षली शरण आल्याने कर्नाटक राज्य नक्षलमुक्त झाले आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)