आता महामार्ग बांधणीच्या कामांवर उपग्रहाद्वारे नजर
By admin | Published: February 27, 2017 04:46 AM2017-02-27T04:46:30+5:302017-02-27T04:46:30+5:30
राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य पूर्ण न झाल्यामुळे सरकार आता ते गाठण्यासाठी उपग्रहांची मदत घ्यायची तयारी करीत आहे.
नितीन अग्रवाल,
नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य पूर्ण न झाल्यामुळे सरकार आता ते गाठण्यासाठी उपग्रहांची मदत घ्यायची तयारी करीत आहे. रस्त्याच्या बांधणीच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत उपग्रहाद्वारे सरकार लक्ष ठेवेल. जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी सल्लागाराचा शोध सुरू करण्यात आला आहे.
महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार रस्तेबांधणीच्या प्रगतीवर कठोरपणे लक्ष ठेवले गेल्यास काम वेळेत पूर्ण होईल त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल. रस्ते निर्मितीची योजनादेखील उपग्रह आणि हवाई पाहणीच्या माध्यमातून तयार केली जाईल. त्या माध्यमातूनच तांत्रिक बाजू तपासल्या जातील. योजनेत येणाऱ्या अडथळ््यांना व इतर आव्हानांना उपग्रह तंत्रज्ञानामुळे नेमके समजून घेता येईल. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र, लोकसंख्या आणि विशेष महत्वाच्या इमारतींचे स्पष्ट चित्र समोर येईल
>कोण करणार वापर?
उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर या मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ
इंडिया, सीमा रस्ते संघटना (बीआरओ) आणि सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या संस्थांच्या प्रकल्पांसाठी केला जाईल.