आता, मला फासावर लटकवणार का?, त्या प्रश्नावरुन बाबा रामदेव संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 09:17 AM2021-05-28T09:17:00+5:302021-05-28T09:33:55+5:30
योग गुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला होता.
नवी दिल्ली - अॅलोपॅथीच्या उपचारांवर वादग्रस्त भाष्य करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी रामदेव बाबा यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दिल्लीतील आयपी इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तसेच, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली आहे. यासंबंधित प्रश्नावरुन एका मुलाखतीत बाबा रामदेव संतापले.
योग गुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. 'आयएमए'कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीण्यात आलं असून यात बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय बाबा रामदेव यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आहे. यात बाबा रामदेवांना पुढील 15 दिवसांत त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडिओ जारी करून लेखी माफी मागायला सांगितले आहे. तसेच, रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात, बाबा रामदेव यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, आता काय मला फाशी देता का? असा प्रतिप्रश्न बाबा रामदेव यांनी विचारलाय.
मी देशद्रोह नाही केला, ज्या वक्तव्याची चर्चा केली जातेय ते मी केलेलं नाहीच. मी केवळ एक सोशल मीडिया मेसेज वाचला होता, जो वापसही घेतला आहे, त्यामुळे विषय संपला. आता काय इच्छा आहे, मला फासावर लटकवणार का? असा प्रतिप्रश्न बाबा रामदेव यांनी केला आहे. दैनिक भास्करसाठी बाबा रामदेव यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली, त्यावेळी अशा शब्दात संताप व्यक्त केला.
मोदींनी लक्ष घालावे, अशी IMA ची मागणी
"पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला नागरिकांना कोरोना विरोधीत लस घेण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला 'पतंजलि'चे योगगुरू बाबा रामदेव कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही देशात १० हजार डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचं सांगत फिरत आहेत. इतकंच नव्हे, तर अॅलोपॅथीच्या उपचारांमुळे देशात कोरोना रुग्णांनी जीव गमावला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांचं हे विधान अतिशय दुर्दैवी आणि अशोभनीय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी. बाबा रामदेव लसीकरणाबाबत लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्ग कारवाई व्हावी", अशी मागणी 'आयएमए'कडून करण्यात आली आहे.
रामदेवांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य -
काही दिवसांपूर्वीच बाबा रामदेव एका कार्यक्रमात म्हणाले होते, अॅलोपॅथी ओषधं घेतल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अॅलोपॅथी स्टुपीड आणि दिवाळखोर सायन्स असल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यांवरून वाद वाढल्यानंतर आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेनंतर रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.