'पप्पू' ऐवजी आता 'युवराज', भाजपाचा नवा व्हिडिओ रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 02:56 PM2017-11-16T14:56:19+5:302017-11-16T15:01:06+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये पप्पू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपाने पप्पू शब्द वगळून त्याऐवजी युवराज शब्द वापरला आहे.
अहमदाबाद : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये पप्पू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपाने पप्पू शब्द वगळून त्याऐवजी युवराज शब्द वापरला आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून निवडणूक प्रचारासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये अभिनेते मनोज जोशी एका पुस्तक स्टॉलचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या व्हिडिओमधून पप्पू शब्दाचा वापर करुन राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाने पप्पू शब्दावर आक्षेप घेतल्यावर आता त्याजागी युवराज हा शब्द वापरण्यात आला आहे. दुसरीकडे, पप्पू शब्द बदलण्यात आल्यानंतर भाजपाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी अनोखे ट्विट करत राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. त्यांनी प.पु.राहुल भाई असे ट्विट केले आहे.
प.पु.राहुल भाई ...
— Paresh Rawal (@SirPareshRawal) November 15, 2017
दरम्यान, आयोगाकडून पप्पू शब्द वापरायला मनाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की जाहिरातींचे लेखन हे कोणत्याही व्यक्तिशी संबंधित नव्हते. गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेखालील प्रसारमाध्यम समितीने तिच्याकडे गेल्या महिन्यात मंजुरीसाठी सादर केलेल्या जाहिरातीतील शब्दाला आक्षेप घेतला होता, असे भाजपाने म्हटले. निवडणुकीशी संबंधित कोणतीही जाहिरात करायच्या आधी आम्हाला समितीकडे प्रमाणपत्रासाठी तिचे लेखन सादर करावे लागते. तथापि, समितीने पप्पू या शब्दाला तो मानहानिकारक असल्याचे सांगून आक्षेप घेतला. तो शब्द काढून टाकून त्याऐवजी दुसरा शब्द वापरण्यास त्यांनी आम्हाला सांगितल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
પ.પૂ. રાહુલ ભાઇ ...
— Paresh Rawal (@SirPareshRawal) November 15, 2017
यशवंत सिन्हांनी मोदींची तुलना केली तुघलकाशी
भाजपाचे नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोटांबदीच्या निर्णयासाठी महंमद बिन तुघलकाशी तुलना केली. सिन्हा म्हणाले की, 14 व्या शतकातील दिल्लीचा राजा तुघलकानेही 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. येथे कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी मोदी यांच्या वादग्रस्त ठरलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 3.75 लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा केला. अनेक राजे पूर्वी होऊन गेले की ज्यांनी आपले स्वत:चे चलन आणले. काही जणांनी नवे चलन आणल्यानंतरही जुनेही कायम ठेवले. परंतु 700 वर्षांपूर्वीच्या शहेनशाहने (तुघलक) स्वत:चे चलन आणल्यानंतर जुने चलन रद्द केले होते. तुघलकाची दिल्लीतील राजवट फारच थोडा काळ होती तरी त्याने राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती, असे ते म्हणाले.