"मणिपूर हिंसाचारावर संसदेत बोलू दिलं नाही", भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदाराचे धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:46 PM2023-08-12T18:46:16+5:302023-08-12T18:48:08+5:30
लोरहो पफोज यांना कोणी बोलू दिले नाही, असे विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपचा मित्रपक्ष असल्याने हात बांधले आहेत, असे लोरहो पफोज म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष नागा पीपल्स फ्रंटच्या (NPF) खासदाराने मणिपूर हिंसाचाराबद्दल धक्कादायक विधान केले आहे. पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावर बोलायचे होते. मात्र वरिष्ठांनी संसदेत बोलण्याची परवानगी दिली नाही. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यापासून रोखण्यात आले. आम्ही भाजपचे मित्रपक्ष असलो तरी आपल्या लोकांसाठी बोलण्याचीही जबाबदारी आहे, असे स्पष्ट शब्दांत एनपीएफ खासदार लोरहो पफोज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोरहो पफोज यांना कोणी बोलू दिले नाही, असे विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपचा मित्रपक्ष असल्याने हात बांधले आहेत, असे लोरहो पफोज म्हणाले. तसेच, भाजपने राज्यात विकास केला आहे, डोंगराळ भागातही चांगले काम केले आहे. पण राज्यात नुकताच झालेला हिंसाचार हाताळण्यात भाजपची चूक झाली आहे, असेही लोरहो पफोज म्हणाले.
याचबरोबर, लोरहो पीफोज यांनी काँग्रेसने नेते राहुल गांधींचे कौतुक केले. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते असतानाही राहुल गांधी मणिपूरला पोहोचले. त्यांनी हिंसाग्रस्त लोकांसोबत चर्चा केली. जे योग्य होते आणि परिस्थितीची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरकडे लक्ष देत नाहीत ही माझ्यासाठी दुःखाची बाब आहे. पंतप्रधानांनी तिथे जाऊन जनतेच्या जखमेवर मलम लावले पाहिजे, असे लोरहो पफोज यांनी म्हटले आहे.
मणिपूर हिंसाचारावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधक केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारामुळेच अविश्वास प्रस्ताव आणला गेला. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच, मणिपूरमध्ये आग लागली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत हसणे आणि विनोद करणे, हे अशोभनीय आहे, असे राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले होते.