लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजपाला धक्का, एका मित्रपक्षाने सोडली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 09:46 PM2019-05-18T21:46:56+5:302019-05-18T21:47:52+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.
इंफाळ - लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता अगदी जवळ आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काँग्रेसच्या गोटात धडधड वाढली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. पूर्वेत्तर राज्यातील मणिपूरमध्ये भाजपासोबत आघाडीत असलेल्या नागा पीपल्स फ्रंटने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ने याची घोषणा केली.
याबाबत नागा पीपल्स फ्रंटचे प्रवक्ते अचुमबेमे किकोन यांनी सांगितले की, कोहिमा येथील एनपीएफच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर मणिपूरमधील भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूरमध्ये सध्या एन. वीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आहे.
Achumbemo Kikon, Naga People's Front (NPF) Spokesperson to ANI: We had a long meeting at NPF central office in Kohima and decided to withdraw support in principle from the BJP led Manipur government. pic.twitter.com/XOAf5i65mT
— ANI (@ANI) May 18, 2019
एनपीएफने पाठिंबा काढून घेतला असला तरी मणिपूरमधील भाजपाची सत्ता स्थिर आहे. 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपाचे 29 आमदार असून, एलजेपीचा एक, एआयटीसीचा एक आणि एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा आहे. एनपीएफच्या चार आमदारांनी पाठिंबा काढून घेण्यापूर्वी विधानसभेत भाजपाला 36 आमदारांचा पाठिंबा होता.
2017 साली झालेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने 21 जागा जिंकल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे संख्याबळ 29 वर पोहोचले होते.