परिस्थिती गंभीर, आसामप्रमाणे दिल्लीतही एनआरसी गरजेचे - मनोज तिवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 01:14 PM2019-08-31T13:14:42+5:302019-08-31T13:15:25+5:30
मनोज तिवारी यांनी ही मागणी अशावेळी केली आहे, की आसाममधील वैध नागरिकांची एनआरसीची अंतिम यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी राजधानी दिल्लीत एनआरसी लागू करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील परिस्थिती गंभीर होत आहे. याठिकाणी अवैध नागरिक राहत आहे. त्यांच्यापासून सर्वाधिक जास्त धोका आहे. त्यामुळे दिल्लीत नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) लागू करणे गरजे आहे, असे मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.
मनोज तिवारी यांनी ही मागणी अशावेळी केली आहे, की आसाममधील वैध नागरिकांची एनआरसीची अंतिम यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मनोज तिवारी यांची मागणी पाहता एनआरसीवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वैध नागरिकांची आसाममधील नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम आज जाहीर करण्यात आली. या एनआरसीच्या अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 06 हजार 657 जणांना या यादीमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच, एनआरसीच्या अंमित यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रायब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील.
एनआरसीचे स्टेट कोऑर्डिनेटर प्रतीक हजेला यांनी सांगितले की, ''आसाममधली 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना एनआरसीच्या शेवटच्या यादीत स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 6 हजार 657 जणांना या अंतिम यादीत स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयाबाबत जे संतुष्ट नसतील ते फॉरिनर ट्रायब्युनलसमोर अपील करू शकतात.''