आसाममध्ये नागरिकता नोंदणीसाठी घेतली 10 हजार रुपयांची लाच; दोघे अधिकारी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:51 PM2019-06-14T18:51:07+5:302019-06-14T18:56:06+5:30
आसाममध्ये घुसखोर आणि स्थानिक यांची ओळख पटविण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आणण्याच्या तयारीत आहे.
गुवाहाटी : आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा केंद्र सरकार आणणार असल्याच्या पार्श्वभुमीवर बाहेरून आलेल्या लोकांची पैसे घेऊन नावे रजिस्टरमध्ये टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी लाचलुचपत खात्याने दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे.
गुरुवारी सैयद शाहजाहा आणि राहुल पराशर अशा दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. गुवाहाटीच्या दिसपूर एनआरसी केंद्र क्रमांक 8 च्या कार्यालयामध्ये ताब्यात घेण्यात आले. आसाममध्ये घुसखोर आणि स्थानिक यांची ओळख पटविण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. याला पश्चिम बंगालमधूनही विरोध झाला आहे.
एसीबीच्या संचालकांनी सांगितले की, सैयद शाहजाहा हे फिल्ड लेव्हल ऑफिसर आणि पाराशर हा लोकल रजिस्टर या पदावर काम करतात. आनंतद नगरचे रहिवासी कजरी घोष दत्त यांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. एनआरसी ड्राफ्टमध्ये त्या महिलेचे नाव नाही असे तिने सांगितले. यामुळे तिने अर्ज दिला होता. यावेळी या दोन अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती.
आरोपींकडे महत्वाचे कागदपत्रही सापडले आहेत. तसेच एनआरसी सेवा केंद्राची तपासणीही केली जात आहे. दोन्ही आरोपींनी महिलेने दिलेल्या अर्जामध्ये काही चुका काढल्या होत्या. या चुका दूर करण्यासाठी त्यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.
एनआरसी 31 जुलै पर्यंत येणार
सर्वोच्च न्यायालयाने 8 मे रोजी सुनावणी करताना एनआरसी लागू करण्यासाठीचा वेळ पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली होती. तसेच 31 जुलै पर्यंत विधेयकाचा मसुदा प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते. तसेच ज्यांची नावे या यादीमध्ये नाहीत त्यांची वंशावळ आणि जमिनीवरील नोंदी यावरून नावे नोंद करण्याचे आदेश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि एन एफ नरीमन यांनी दिले होते.