पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार आल्यास लागू होणार NRC, घुसखोरांची पटणार ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 08:17 PM2018-07-30T20:17:55+5:302018-07-30T20:18:34+5:30
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)वरून उठलेलं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये.
नवी दिल्ली- आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)वरून उठलेलं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये. भाजपानं आता पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारे नागरिकांची ओळख पटवली जाणार असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, जर आमच्या पक्षाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं, तर आसामसारखेच पश्चिम बंगालमध्येही राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC) लागू केलं जाईल. आसाममध्ये लागू झालेल्या NRCमुळे काही जण अश्रू ढाळतायत. कारण त्यांना स्वतःच्या व्होट बँकेचं राजकारण संपण्याचे संकेत मिळत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यास आम्ही एनआरसी लागू करू आणि अवैधरीत्या राहणा-या लोकांना बांगलादेशात परत पाठवू, येणारे दिवस हे कठीण आहेत. आम्ही कोणत्याही अवैध प्रवाशाला पश्चिम बंगालमध्ये सहन करणार नाही. तसेच जे लोक अवैध प्रवाशांचं समर्थन करतात, त्यांना देशातून निष्कासित केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसारच आसाममध्ये एनआरसी लागू करण्यात आला आहे. NRCचा मुद्दा उपस्थित करणारा काँग्रेसच आता त्याला विरोध करत आहे. आम्ही देशाची सुरक्षितता आणि अखंडतेशी कोणताही समझोता करणार नाही.
तत्पूर्वी आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यातील यादीत राज्यातील 2 कोटी 89 लाख रहिवाशांना नागरिकत्वासाठी योग्य मानण्यात आले आहे. तर 40 लाख रहिवाशांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली आहेत. एकूण 3 कोटी 29 लाख 91 हजार 380 रहिवाशांनी नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 2 कोटी, 89 लाख, 38 हजार 677 रहिवाशी नागरिकत्वासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले. तर सुमारे 40 लाख रहिवासी अवैधपणे वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची नावे या मसुद्यातून वगळण्यात आली आहेत.