Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर किती वर्ष टिकणार? ‘या’ महिन्यापासून भाविक दर्शन घेऊ शकणार; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:46 AM2021-10-23T08:46:04+5:302021-10-23T08:48:34+5:30
Ram Mandir: राम नवमीच्या दिवशी सात लाख रामभक्त येथे येऊन दर्शन घेऊ शकतील, असा विश्वास नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला.
अयोध्या: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या (Ayodhya) विवादावर दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर सर्वांच्याच नजरा आता राम मंदिराकडे लागल्या आहेत. राम मंदिर (Ram Mandir) भाविकांना दर्शनासाठी कधी खुले होणार, याबाबत राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती दिली आहे. तसेच राम मंदिराचे काम कुठपर्यंत आले आहे. याशिवाय किती मजबूत आहे तसेच ते किती वर्षांपर्यंत टिकू शकेल, याबाबतही मिश्रा यांनी माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, डिसेंबर २०२३ पासून भाविकांना अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेता येईल. डिसेंबर २०२३ पर्यंतचा कालावधीत निर्धारित केला गेला असून, त्यानुसारच राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. राम मंदिर निर्माणासाठी अनेक आव्हाने येत आहेत. मात्र, त्यावर मार्ग काढत राम मंदिर उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.
राम मंदिर किती वर्षे टिकणार?
राम मंदिर बांधताना स्टीलचा वापर केला जात नाहीए. तसेच सिमेंटही कमीत कमी वापरले जात आहे. राम मंदिरासाठी अन्य गोष्टींच्या वापरावर अधिकाधिक भर दिला जात आहे. आपल्या देशात ५०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली मंदिरे आजही मजबुतीने उभी आहेत. त्या मंदिरांचा अभ्यास करूनच राम मंदिर बांधले जात आहे. तशाच प्रकारचे निर्णय घेण्यात आले असून, काम योग्य पद्धतीने सुरू आहे, असेही मिश्रा म्हणाले.
कोणार्क मंदिराप्रमाणे रचना
राम मंदिराची रचना करताना दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. शास्त्रज्ञ आणि अन्य तज्ज्ञ तशी रचना करण्याचे काम करत आहेत. यासाठी कोणार्क येथील मंदिराचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे आणि तशाच प्रकारचा झडपा तयार करण्यात येणार आहेत, असेही मिश्रा यांनी सांगितले.
एका दिवसांत लाखो भाविक घेऊ शकणार दर्शन
राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर एका दिवसाला लाखो श्रद्धाळू येऊ शकतील. तसेच एका सेकंदाला सात भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात असून, राम नवमीच्या दिवशी सात लाख रामभक्त येथे येऊन दर्शन घेऊ शकतील, असा विश्वास नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला. ते आजतक आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.