मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:49 PM2020-02-20T18:49:38+5:302020-02-20T18:56:48+5:30
केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.
हैदराबाद : केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील आरोपी नृत्य गोपाल दास यांना अध्यक्ष आणि व्हीएचपीचे उपाध्यक्ष चंपत राय यांची महासचिव म्हणून निवड केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. हा नवा भारत असून या ठिकाणी गुन्हेगारीचे काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो, असे सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी यांदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना मशीद विध्वंस करण्याचे कृत्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. हा त्याचाच सिक्वल आहे. एक व्यक्ती जो बाबरी मशीद पाडण्याचा आरोपी आहे, त्याच्याकडे सरकारने राम मंदिर उभारणीची जबाबदारी सोपविली आहे. हा नवा भारत आहे, याठिकाणी गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो."
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या काल झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर चंपत राय यांना या ट्रस्टचे सरचिटणीस बनविण्यात आले. महंत नृत्य गोपाल दास 1984 पासून राम मंदिर आंदोलनाशी निगडीत आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंदिर कार्यशाळेत राम मंदिरासाठी दगड शोधण्याचे काम सुरू होते. बाबरी विध्वंसानंतर सीबीआय कोर्टात दास आणि राय यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे.
दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कामाला आता सुरुवात झाली असून, पुढील 15 दिवसांत प्रत्यक्ष मंदिर बांधकाम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तेथील संत-महन्तांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाची तारीख ठरविण्यात येईल. ट्रस्टच्या कालच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामनवमी 2 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या, तरच कामास प्रारंभ करता येणार आहे.
2024पर्यंत मंदिर पूर्ण?
या मंदिराचे काम कधीही सुरू झाले तरी ते 2024 पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण व्हावे, असा ट्रस्ट प्रयत्न करेल. किंबहुना ते मंदिर तोपर्यंत बांधून पूर्ण करायचे, असेच ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुका 2024मध्ये होतील. त्याआधी मंदिर झाले, तर त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे त्या पक्षाच्या तसेच संघ परिवारातील मंडळींचे म्हणणे आहे. आम्ही आमची घोषणा पूर्ण केली, असे सरकारही तेव्हा सांगू शकेल.