हिंसाग्रस्त भागात अजित डोवाल यांचा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:59 AM2020-02-27T02:59:02+5:302020-02-27T03:01:11+5:30
पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : राजधानी शांत करण्यासाठी पुरेसे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे आता कुणीही घाबरू नये, अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री उशिरा डोवाल यांनी ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. डोवाल यांच्या सक्रियतेमुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे.
लोकांनी पोलिसांच्या क्षमतेवर, हेतूवर शंका घेऊ नये. गणवेशातील रक्षकांवर विश्वास ठेवा. कायद्याचे पालन करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही डोवाल यांनी दिली. डोवाल यांनी जाफराबाद, मौजपुरी, गोकुलपुरी, सिलमपूर भागाचा दौरा केला. पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा त्यांच्यासमवेत होता.
बुधवारी पहाटेपर्र्यंत त्यांनी या भागाची पाहणी केली. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी अहवाल सादर केला. संरक्षण कॅबिनेट समितीसमोरही डोवाल यांनी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा कथन
केला.
गेल्या तीन दिवसांपासून गृहमंत्रालयात बैठका सुरू आहेत. प्रत्येक बैठकीत अजित डोवाल उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी व शहा यांच्या सूचनेवरूनच डोवाल यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. डोवाल स्वत: दर तासाला दिल्लीच्या सुरक्षेचा आढावा दिवसभर घेत होते.