अजित डोभाल यांनी घेतली जॉन बॉल्टन यांची भेट, पाकिस्तानची कोंडी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 10:48 PM2019-03-05T22:48:36+5:302019-03-05T22:48:56+5:30
भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट घेतली.
नवी दिल्ली - भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने भारताविरोधात केलेल्या एफ-16 विमानांच्या वापराबाबतचे पुरावे भारताकडून अमेरिकेकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जागतिक दबावापुढे झुकलेल्या पाकिस्तानकडून सध्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा दिखावा सुरू आहे. मात्र आता अमेरिकेकडूनही पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत निर्मिती झालेल्या एफ-16 विमानांमधून भारतीय हद्दीत झालेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांना माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले. तसेच भारतीय विमानांवर हल्ला करण्यासाठी एफ-16 विमानांतून डागण्यात आलेल्या एआयएम-120 या क्षेपणास्त्राचे तुकडेही दाखवण्यात आले.
NSA Ajit Doval talks to his American counterpart John Bolton on security situation in region after #Pulwama attack&India’s retaliation.India has also shown proof of Pakistan using F-16s to attack Indian planes and target. US defence attaches shown parts of AIM-120 missile. pic.twitter.com/1taZnAefcQ
— ANI (@ANI) March 5, 2019
भारताकडून दाखवण्यात आलेल्या पुराव्यांनंतर अमेरिकेकडून पाकिस्तानवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच एफ-16 विमानांबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच हाफिझ सईदची दहशतवादी संघटना जमात उल दावा आणि या संघटनेची सहसंस्था असलेल्या फालाह ए इंसानियत फाऊंडेशन या संस्थांवर दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.