...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 09:44 AM2018-06-22T09:44:21+5:302018-06-22T09:45:56+5:30
एनएसजी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू होताच केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरोधातील कारवाई आणखी आक्रमक केली आहे. त्यामुळेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सना (एनएसजी) जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कमांडो राज्याच्या पोलीस दलातील जवानांना दहशतवाद्यांचा प्रभावीपणे सामना कसा करायचा, याबद्दलचं प्रशिक्षण देणार आहेत. एनएसजी कमांडोंना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यामागे अशी आहे सरकारची योजना:
दहशतवादविरोधी कारवायांमध्ये हातखंडा
दहशतवादविरोधी कारवायांमध्ये निष्णात असणारे एनएसजी कमांडो जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना प्रशिक्षण देतील. याशिवाय श्रीनगरच्या विमानतळावर हल्ला होऊ नये, याची जबाबदारीदेखील एनएसजीकडे असेल. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असेल, त्या ठिकाणी एनएसजी कमांडोचा वापर केला जाऊ शकतो.
याआधीही जम्मू-काश्मीर पोलिसांना प्रशिक्षण
एनएसजी कमांडोंनी याआधीही जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना प्रशिक्षण दिलं आहे. केंद्रातील सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसजी कमांडो उपकरणांच्या हाताळणीत कुशल असतात. त्यामुळे त्यांचा जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत मोठा फायदा होईल.
कमी अंतरावरील चकमकींमध्ये मदत मिळणार
दहशतवादविरोधी अभियानांमधील जाणकारांनुसार, कमी अंतरावर सुरू असणाऱ्या चकमकींमध्ये एनएसजी कमांडोंची मदत मिळू शकते. जम्मू-काश्मीरमधील जवानांना अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत एनएसजी कमांडोंचा अनुभव महत्त्वाचा ठरु शकतो. नागरी वस्तीत कारवाया करताना जवानांचा अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र अशा कारवायांचा दांडगा अनुभव एनएसजी कमांडोंना आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी एनएसजीनं याची चुणूक दाखवली होती.
अत्याधुनिक उपकरणांची मदत
दहशतवादविरोधी कारवाया करताना एनएसजी कमांडो अत्याधुनिक शस्त्रसामग्रीचा वापर करतात, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. त्यामुळेच या कमांडोंचा वापर केवळ 26/11 किंवा पठाणकोटसारख्या हल्ल्यांवेळी करता कामा नये, असं सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांना वाटतं.
बीएसएफच्या कॅम्पमध्ये एनएसजीच्या तुकड्या असणार
जम्मू-काश्मीर पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसजीच्या काही तुकड्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये असतील. यासाठी एनएसजीचे डीजी सुदीप लखटकिया लवकरच श्रीनगरला जाणार आहेत. त्यांच्याकडून कमांडोंना विविध ठिकाणी तैनात केलं जाईल.