नूहमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, इंटरनेट बंद; दंगलीनंतर पुन्हा ब्रिजमंडल शोभायात्रेवर विहिंप ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 08:52 AM2023-08-28T08:52:54+5:302023-08-28T08:54:15+5:30
Nuh Shobha Yatra: सरकारने 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मोबाईल इंटरनेटवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे.
हरियाणातील नूहमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर पुन्हा एकदा ब्रिजमंडल शोभायात्रा काढण्याची विश्व हिंदू परिषदेने हाक दिली आहे. यामुळे तिथे पुन्हा दंगा भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बाहेरील व्यक्तींनाही प्रवेश बंदी करण्यात आली असून जिल्ह्यात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. तसेच इंटरनेटही बंद ठेवण्यात आले आहे.
प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बल्क एसएमएस सेवाही बंद करण्यात आली आहे. नूहमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून, त्याअंतर्गत सोमवारपर्यंत चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सरकारने 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मोबाईल इंटरनेटवर बंदी घातली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) ममता सिंग यांनी रविवारी सांगितले की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनीही या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे. हरियाणा पोलिसांचे 1,900 कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या 24 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जवळच्या मंदिरात पूजा करण्याचे आवाहन केले आहे.
31 जुलै रोजी हरियाणातील मेवात-नूह येथे ब्रिज मंडळ यात्रा काढण्यात आली होती. यादरम्यान यात्रेवर दगडफेक झाली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले. शेकडो गाड्या पेटवल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. नूह हिंसाचारात दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला होता.