नूंह हिंसाचार : ४४ FIR दाखल, ७० जण ताब्यात…; दंगेखोरांना सोडले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 07:40 PM2023-08-01T19:40:10+5:302023-08-01T19:53:58+5:30
या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नूंह : हरयाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. या हिंसाचारात जवळपास पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. व्हीएचपीच्या रॅलीमध्ये प्रमुख गोरक्षक मोनू मानेसर यांच्या कथित उपस्थितीवरून तणाव शिगेला पोहोचल्यानंतर नूंह आणि गुरुग्राममध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दल आणि पोलिस दलाच्या २०-२० कंपन्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही नूंहमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोहर लाल खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "नुंहमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासनाला तातडीने पाठविण्यात आले. दरवर्षी निघणाऱ्या सामाजिक यात्रेवर काही लोकांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले."
याचबरोबर, मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, "नियोजित आणि कट रचून यात्रा उधळली गेली, जे मोठे षड्यंत्र दर्शवते. वाहने जाळण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, सध्या नुंहसह सर्वत्र परिस्थिती सामान्य आहे. या घटनेत सहभागी असलेल्या नूंह बाहेरील लोकांची ओळख पटवली जात आहे. दंगेखोरांना सोडले जाणार नाही. सर्व नागरिकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे यावे. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे. हेल्पलाइन क्रमांक-११२ आणि ८९३०९००२८१ वर याबाबत माहिती देऊ शकतात."
पोलिसांनी काढला फ्लॅग मार्च
नूंह येथील एसपी नरेंद्र सिंह बिजारणिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "जिल्ह्यात विविध ठिकाणी निमलष्करी दलाच्या २० कंपन्या आणि पोलिस दलाच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सकाळी पोलिस दलाकडून फ्लॅग मार्चही काढण्यात आला आहे. कलम-१४४ चे पालन सुनिश्चित केले जात आहे आणि कर्फ्यू नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.