जूनमध्ये हवाई प्रवाशांची संख्या रोडावली; कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:22 PM2020-07-18T23:22:36+5:302020-07-19T06:11:53+5:30
क्षमतेपेक्षा मिळाले कमी प्रवासी
नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना जूनमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. विमानांना आसन क्षमतेच्या तुलनेत एक चतुर्थांश प्रवाशांसह उड्डाण करावे लागले.
नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या जूनमध्ये भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी १.९८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा तब्बल १२.०३ दशलक्ष होता. यावरून झालेली घसरण लक्षात यावी.
मोठ्या नियोजित व्यावसायिक एअरलाइन्सचा प्रवासी भार घटक (पॅसेंजर लोड फॅक्टर) ५४ टक्के ते ६८ टक्के यादरम्यान राहिला. याचाच अर्थ विमान कंपन्या अजून दोनतृतीयांश प्रवासी घेऊ शकल्या असत्या. २०१९ मधील प्रवासी भार घटक ८१ ते ९४ टक्के होता.
भार घटक अथवा प्रवासी भार घटक हे हवाई वाहतूक क्षेत्रातील एअरलाइन्सचे प्रवासी वहन क्षमता मोजण्याचे एक मापक आहे.
भारतातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचा जूनमधील बाजार हिस्सा ५२.८ टक्के राहिला, तसेच कंपनीचा भार घटक ६०.७ टक्के होता. या महिन्यात कंपनीने १.०४ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. स्पाईसजेटचा बाजार हिस्सा १६.८ टक्के आणि भार घटक ६८ टक्के राहिला. या कंपनीने ०.३३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. एअर इंडियाचा देशांतर्गत भार घटक ५६.५ टक्के राहिला आणि बाजार हिस्सा १२.२ टक्के राहिला. भारताच्या या राष्ट्रीय एअरलाईनने जूनमध्ये ०.२४ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली.
टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा भागीदारीतील उद्यम असलेल्या विस्ताराचा भार घटक ५६.६ टक्के आणि बाजार हिस्सा ५.६ टक्के राहिला. टाटा सन्स आणि एअर एशिया बेºहाड यांचा संयुक्त उद्यम असलेल्या एअर एशियाचा भार घटक ५६.५ टक्के आणि बाजार हिस्सा ७.१ टक्के राहिला. वाडिया समूहाच्या गोएअरचा भार घटक ५७.९ टक्के आणि बाजार हिस्सा ४.५ टक्के राहिला.
विस्ताराने १,१२,०० प्रवाशांची वाहतूक केली. एअर एशिया इंडियाने १,४०,००, तर गोएअरने ८९,००० प्रवाशांची वाहतूक केली.
वृद्धीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरण
आदल्या वर्षी या काळातील प्रवासी वाहतूक ७०.६६ दशलक्ष होती. याचाच अर्थ यंदा वार्षिक वृद्धी उणे (-) ५०.२२ टक्के, तसेच मासिक वृद्धी उणे (-)८३.५० टक्के राहिली, असे डीजीसीएने म्हटले आहे.
जूनमध्ये विस्ताराने 16.50% उड्डाणे रद्द केली. देशांतर्गत पूर्वनियोजित विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे एकूण प्रमाण ३.०३ टक्के राहिले.