काश्मीर हिंसाचारातील मृतांची संख्या ३४ वर
By admin | Published: July 14, 2016 03:09 AM2016-07-14T03:09:43+5:302016-07-14T03:09:43+5:30
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे
श्रीनगर/नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आतापर्यंतच्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ३४ झाली आहे, तसेच पोलिसांनी गोळीबाराऐवजी बंदुकीतून छऱ्यांचा मारा केल्यामुळे ९२ जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना अंधत्व येण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर १९३१ मधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या दु:खावर फुंकर घालण्यास सरकारचे प्राधान्य आहे.’
मात्र, पम्पोर आणि कुपवाडा गावांसह काश्मीर खोऱ्याच्या काही भागांत संचारबंदी कायम आहे. खोऱ्यात मोबाइल इंटरनेट आणि रेल्वे सेवा बंदच आहे. मोबाइल फोन कूपवाडा भागात बंद करण्यात आली आहे.
शस्त्रे हिसकावली
पोलिसांकडील हिसकावण्यात आलेल्या ७० बंदुकांचा वापर फुटीरवादी शस्त्रे आणि दारूगोळा वाढविण्यासाठी करतील, अशी
भीती आहे. दोन दिवसांपूर्वी कुलगाममधील दमहल हांजी पोरा पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला करून, सेमी आॅटोमॅटिक व आॅटोमॅटिक अशा ७० बंदुका हिसकावून नेल्या होत्या.
सरकारला अपयश : अब्दुल्ला
बुऱ्हान वनीच्या मृत्युमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन करून घेण्यात मेहबुबा सरकारला अपयश आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. २००८ आणि २०१० मध्ये खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. त्यांचा धडा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी-भाजपा युती विसरली, असे अब्दुल्ला म्हणाले. मेहबुबा मुफ्ती या राज्यात परिस्थिती सामान्य असल्याचे निलाजरेपणे सांगत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)