CoronaVirus News : देशभरात तपासण्यांचे प्रमाण अन् रुग्णही वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:56 AM2020-06-24T03:56:21+5:302020-06-24T03:56:36+5:30

रुग्णांची आकडेवारीही फुगत चालली आहे, परंतु सरासरी पाहिली तर नवीन रुग्णांचे प्रमाण आधीच्या तुलनेत कमी दिसून येते, ही सकारात्मक बाब आहे.

The number of check-ups and patients has also increased across the country! | CoronaVirus News : देशभरात तपासण्यांचे प्रमाण अन् रुग्णही वाढले!

CoronaVirus News : देशभरात तपासण्यांचे प्रमाण अन् रुग्णही वाढले!

Next

विकास झाडे
नवी दिल्ली : कोरोना तपासणी करण्याचे प्रमाण देशभर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिल्लीमध्ये गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत तपासणीचे प्रमाण तिपटीने वाढले, त्यानुसार रुग्णांची आकडेवारीही फुगत चालली आहे, परंतु सरासरी पाहिली तर नवीन रुग्णांचे प्रमाण आधीच्या तुलनेत कमी दिसून येते, ही सकारात्मक बाब आहे.
दिल्लीमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात कोविड-१९ च्या दररोज पाच हजार तपासण्या होत होत्या. आता १६ हजार होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासण्या करूनही कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आधीसारखीच आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याकडे लक्ष वेधले आहे. महिनाभरात देशात वैद्यकीय तपासण्यांमध्ये ६७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण त्यामुळे १४६ टक्क्यांच्या घरात पोहचले आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी १५ हजारांच्या घरात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गोव्यात पहिल्यांदाच मंगळवारी सकाळपर्यंत ११० कोरोनाग्रस्तांची उच्चांकी भर पडली आहे. देशात आतापर्यंत ७० लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. पुढच्या काही दिवसांत दररोज २ लाख वैद्यकीय तपासण्या करण्याची तयारी सुरू आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत १४ हजार ९३३ नवीन रुग्णांची भर पडली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ४ लाख ४० हजार २१५ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी १० हजार ९९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ५६.४% कोरोनामुक्तीच्या दराने देशातील रुग्ण कोरोनावर मात करीत आहेत. सध्या देशातील १ लाख ७८ हजार १४ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूने आतापर्यंत १४ हजार ११ रुग्णांचा बळी घेतला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत ३१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत देशातील ७१ लाख ३७ हजार ७१६ नागरिकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील २.६% तपासण्या (१ लाख ८७ हजार) गेल्या एका दिवसात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे. २१ मे ते आतापर्यंतच्या वैद्यकीय तपासणीची तुलना केली तर ६७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत तमिळनाडू (२,७१०), तेलंगणा (८७२), केरळ (१३८), नागालँड (६९) तसेच हिमाचल प्रदेशात (५४) नवीन कोरोनाबाधितांची भर पडली.
>महाराष्ट्र जगात १७ व्या स्थानी
कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत चौथ्या स्थानी आहे. या सर्व देशांच्या यादीत महाराष्ट्रानेही जागा मिळवली आहे. महाराष्ट्रात १ लाख ३५ हजार ७९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जगात महाराष्ट्र १७ व्या स्थानी आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि बांगलादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित आहेत. कोरोना बळींच्या संख्येच्या बाबतीतही तिच स्थिती आहे. अनेक देशांपेक्षा जास्त बळी महाराष्ट्रात गेले आहेत. महाराष्ट्रात ६ हजार २८३ रुग्णांचा बळी कोरोनाने घेतले आहेत. चीन, पाकिस्तान, टर्की, स्वीडन, हॉलंड, दक्षिण कोरिया, बांगलादेशपेक्षा जास्त बळी महाराष्ट्रात गेले आहेत.

Web Title: The number of check-ups and patients has also increased across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.