देशातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत घट, सरासरी रेट घसरुन 18.17 टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:40 PM2021-05-17T16:40:18+5:302021-05-17T16:49:40+5:30
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्रातही गेल्या महिनाभराच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत होती. मात्र, तब्बल 26 दिवसांनंतर देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 तासांत 3 लाखांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार कोरोनाबाधितांची गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या 2 लाख 81 हजार 386 वर येऊन पोहोचली आहे. गेल्या आठवडाभरातील पॉझिटीव्ह रुग्णांची सरासरीही घटली आहे.
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्रातही गेल्या महिनाभराच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 34,389 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून तामिळनाडूत 33,181 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा सरासरी आकडा कमी होऊन आज 18.17 वर येऊन पोहोचला आहे.
देशभरात गेल्या 24 तासांत 3 लाख 78 हजार 741 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर, एकूण 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 84.81 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पुण्यातही रुग्णसंख्या घटली
दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडणाऱ्या पुण्यालाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज शहरात नव्याने सापडलेल्या रुग्णांची संख्या थेट 700 च्या आसपास आली आहे. पुणे शहरात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आटोक्यात येत असलेल्या कोरोना ने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली. एकट्या पुणे शहरातच रुग्ण संख्या पाच हजारांचा आसपास पोहोचली होती. पण, आता या रुग्ण वाढीतून पुण्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकूण रुग्ण 700 आसपास आले आहेत.