नव्या रुग्णांची संख्या सहा दिवसांनी पुन्हा 40 हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:40 AM2021-08-13T06:40:54+5:302021-08-13T06:41:11+5:30
केरळमध्ये सापडले २३ हजार रुग्ण; ४९० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल सहा दिवसांनंतर पुन्हा ४० हजारांवर पोहोचला आहे. देशात गेल्या चोवीस तासांत ४१ हजार नवे कोरोनाबाधित सापडले व आणखी ४९० जणांचा संसर्गाने मृत्यू झाला. केरळममध्ये सर्वाधिक २३५०० नवे रुग्ण आढळले असून तेथील कोरोना स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी २० लाख ७७ हजार ७०६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १२ लाख ६० हजार ५० रुग्ण बरे झाले तर उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण ३ लाख ८७ हजार ९८७पर्यंत वाढले आहे.
कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची आकडेवारी ४ लाख २९ हजार ६६९ झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची सलग पाचव्या दिवशीही वाढली. एकूण रुग्णांच्या तुलनेत १.२१ टक्के जण उपचार घेत आहेत. ९७.४५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले.देशात केरळमध्ये सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. मात्र या राज्याचा १५.९१ टक्के संसर्गदर गेल्या चोवीस तासांत १४.४९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे ही दिलासादायक बाब आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, सध्या त्या राज्यात १ लाख ७५ हजार ९५७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत व १९४११ जण बरे झाले. भारतात आजवर ४८ कोटी ७३ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर कोरोना लसीचे ५२.३६ कोटी डोस नागरिकांना देण्यात आले. गेल्या सतरा दिवसांपासून कोरोनाचा दररोजचा संसर्गदर १.९४ टक्के झाला आहे. तर आठवड्याचा संसर्गदर २.२३ टक्के झाला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.३४ टक्के आहे.
बंगळुरूत ३०० वर मुलांना संसर्ग
बंगळुरूत ३००हून अधिक मुले कोरोना बाधित बंगळुरूमध्ये गेल्या सहा दिवसांत १९ वर्षे वयाखालील ३००पेक्षा अधिक मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कर्नाटकामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मुलांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाबाधित मुलांपैकी १२७ जण १० वर्षांखालील, १७४ मुले १० ते १९ वर्षे वयोगटातील आहेत.
अमेरिकेत ३ कोटी झाले बरे
अमेरिकेत बरे झाले ३ कोटी लोकअमेरिकेत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ३ कोटींवर पोहोचली आहे. तिथे ३ कोटी ७० लाख कोरोना रुग्ण आहेत. तिथे आजवर ६ लाख ३५ हजार जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जगात २० कोटी ५६ लाख रुग्ण असून त्यातील १८ कोटी ४५ लाख जण बरे झाले.