मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:38 AM2021-05-09T01:38:14+5:302021-05-09T06:53:19+5:30

एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या.

The number of patients in Mumbai has decreased, 10,000 beds are vacant; Information of Mumbai Municipal Commissioner | मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती 

मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती 

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचा प्रसार आता मुंबईत हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रुग्णसंख्येतही मोठी घट होत आहे. त्यामुळे मुंबईतील १७८ रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी राखीव ९,२७९ खाटा रिकाम्या आहेत तर अतिदक्षता विभागातही आता १६४ खाटा रिक्त आहेत, अशी माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शनिवारी दिली. (The number of patients in Mumbai has decreased, 10,000 beds are vacant; Information of Mumbai Municipal Commissioner)

एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली. त्यानुसार कोविड रुग्णांसाठी १७८ रुग्णालयांमध्ये २२ हजार ७०३ खाटा राखीव ठेवण्यात आल्या. यापैकी ४० टक्के खाटा आता रिकाम्या आहेत.

आयसीयू, व्हेंटिलेटर खाटाही उपलब्ध...
मार्च - एप्रिल महिन्यात रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईत ऑक्सिजन खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आयसीयू, व्हेंटिलेटर खाटाही कमी पडू लागल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने अतिदक्षता विभागातील रिक्त खाटांचे प्रमाणही १६४ आहे तर ३२ व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत.

मुंबई पालिका आयुक्तांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
मे २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे राज्य सरकारने इक्बालसिंह चहल यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन कोरोना विरोधातील लढा यशस्वी करण्यात आला. चेस दि व्हायरस, वॉर्ड वॉर रूममार्फत खाटांचे नियोजन आणि आता मुंबई मॉडल आदर्श ठरले. धारावी पॅटर्नचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. तर गेल्या महिन्यात संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना, विविध उपाययोजना राबवून रुग्णांना वाचविण्याचे काम महापालिकेने केले. बाधित रुग्णांना शोधणे, विभाग स्तरावरील वॉर रूममार्फत रुग्णांना खाटा उपलब्ध करणे, जंबो फिल्ड रुग्णालयांची निर्मिती, खाटांची संख्या वाढवणे, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवणे, खासगी रुग्णालयाने दिलेले सहकार्य. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रभाव, पालिका कर्मचारी-अधिकारी यांनी दिवस-रात्र केलेली मेहनत यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर कमी आणण्यात यश आले, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे.
 

Web Title: The number of patients in Mumbai has decreased, 10,000 beds are vacant; Information of Mumbai Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.