वाघांच्या संख्येत १०० वर्षांत प्रथमच वाढ !
By admin | Published: April 12, 2016 02:43 AM2016-04-12T02:43:34+5:302016-04-12T02:43:34+5:30
जगभरातील जंगलांमध्ये असलेल्या वाघांच्या संख्येत गेल्या शंभरहून अधिक वर्षांत प्रथमच वाढ झाल्याचे शुभसंकेत मिळाले असून विविध देशांची सरकारी व व्याघ्र संरक्षणासाठी
नवी दिल्ली : जगभरातील जंगलांमध्ये असलेल्या वाघांच्या संख्येत गेल्या शंभरहून अधिक वर्षांत प्रथमच वाढ झाल्याचे शुभसंकेत मिळाले असून विविध देशांची सरकारी व व्याघ्र संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या ताज्या व्याघ्रगणनेत भारतीय उपखंडाखेरीज रशियापासून व्हिएतनामपर्यंतच्या देशांंमध्ये एकूण ३,८९० जंगली वाघ असल्याचे आढळून आले आहे.
व्याघ्र संवर्धन मोहिमेत सहभागी असलेल्या १३ आशियाई देशांच्या तिसऱ्या परिषदेचे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन व्हायचे आहे. त्याच्या पूर्वसंध्येस जागतिक वन्यजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) व ‘ग्लोबल टायगर फोरम’ यांनी सोमवारी ही आकडेवारी जारी केली.
ही आकडेवारी ताज्या म्हणजे २०१४च्या आंतरराष्ट्रीय व्याघ्रगणनेवर आधारित आहे.
वाघांची संख्या सन २०१० मध्ये ३,२०० या सार्वकालिक निचांकावर पोहोचली होती. या पार्श्वभूमीवर २०१४ ची आकडेवारी व्याघ्र संवर्धन प्रयत्नांच्या यशाचे शुभसंकेत देणारी मानली जात आहे. ही आनंददायी बाब असली तरी याचा अर्थ वाघांची संख्या खरंच वाढली आहे, असा होतोच असे नाही, याकडेही तज्ज्ञ लक्ष वेधतात. असेही असू शकते की, सर्वेक्षणाच्या प्रगत तंत्रामुळे व अधिक क्षेत्रांचे सर्वेक्षण झाल्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक वाघांची नोंद झाली असावी.
३८० कोटींचा निधी
भारत सरकारने ‘प्रॉजेक्ट टायगर’साठी आजवरची सर्वाधिक म्हणजे ३८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून भारताच्या राष्ट्रीय प्राण्याच्या संवर्धसासाठी सरकारची प्रतिबद्धता दिसून येते, असे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ‘टायगर रेंज’मधील भारत, नेपाळ, रशिया व भुतान यासारख्या देशांमध्ये वाघांची संख्या वाढली असली तरी वाघ हा अजूनही विलुप्ततेच्या धोक्यातच आहे.
काही देशांमध्ये वाघांची संख्या विलुप्ततेच्या पातळीपर्यंत पोहोचणे ही चिंतेची बाब आहे. या व अशा विषयांवर परिषदेत विचार-विनिमय होईल.
या तीन दिवसीय परिषदेत ७०० पेक्षा अधिक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि या क्षेत्राशी संबंधित जाणकार सहभागी होत आहेत.
देशनिहाय गणती
बांगलादेश-१०६
भूतान-१०३
चीन-सातहून अधिक
भारत-२,२२६
इंडोनेशिया- ३७१
लाओस-०२
मलेशिया-२५०
नेपाळ-१९८
रशिया-४३३
थायलंड-१८९
व्हिएतनाम-पाचहून कमी