नुपूर शर्मांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, पाकिस्तानी घुसखोराला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:57 PM2022-07-19T19:57:39+5:302022-07-19T19:59:13+5:30
Nupur Sharma : राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे भारत-पाक सीमेवर एका घुसखोराला अटक केली असून त्याने नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावरून सुरु झालेला वाद थांबत नाही आहे. आता याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे भारत-पाक सीमेवर एका घुसखोराला अटक केली असून त्याने नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी पाकिस्तानातील हा घुसखोर भारतात पोहोचला होता. अशरफ रिझवान असे या घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती हिंदुमलकोट सेक्टरमध्ये असलेल्या खाखान चेकपोस्टवरून देशाच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. पाकिस्तानच्या पंजाबमधील मंडी बहाउद्दीन येथील रहिवासी असलेल्या अशरफबाबत आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
अशरफचा भारतात येण्यामागचा हेतू अत्यंत घातक होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएफच्या चौकशीत उघड झाले आहे की, या घुसखोराला भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माची हत्या करायची होती. नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अशरफ दुखावला होता. भारतात प्रवेश केल्यानंतर अशरफला श्रीगंगानगरहून अजमेर दर्ग्याला जायचे होते. येथे चादर चढवून त्याने नुपूर शर्मा यांना मारण्याचा कट रचला होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इयत्ता आठवीपर्यंत शिकलेल्या अशरफला उर्दू, पंजाबी आणि हिंदी भाषा समजते.
पाकिस्तानमध्ये मौलवींची बैठक!
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये मौलवींची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत अशरफ रिझवानचाही सहभाग होता. या बैठकीनंतरच त्याने नुपूर शर्मा यांना मारण्याचा निर्णय घेतला होता. अशरफ रिझवानकडून काही धार्मिक पुस्तके आणि दोन चाकूही जप्त करण्यात आले आहेत. तसेच, अशरफ रिझवानच्या चौकशीत इतरही अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.
नुपूर शर्मा यांना मोठा दिलासा
नुपूर शर्मा यांना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. दरम्यान, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पैगंबरांबद्दल वक्तव्ये करून वादात सापडलेल्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशातील अनेक भागात एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्या अटकेला तूर्तास स्थगिती दिली आहे.
नुपूर शर्मा यांनी आपल्या याचिकेत देशभरात दाखल झालेले विविध गुन्हे दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी केली होती आणि अटकेला स्थगिती देण्याचीही मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत नुपूर शर्मांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.