प्रेषित अवमानप्रकरणी निषेध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर; नाराजी अधिकच वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:44 AM2022-06-07T09:44:32+5:302022-06-07T09:46:12+5:30
नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून भारताविषयी इस्लामिक देशांची नाराजी वाढत चालली असून, निषेधाचा सूर तीव्र होत असल्याचे दिसत आहे.
नवी दिल्ली: भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अपमानकारक विधानाचे देशासह जगभरातील इस्लामी देशांत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. देशाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप विरोधक करत असतानाच या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या आंतरराष्ट्रीय इस्लामी देशांमध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत चालली आहे. प्रेषित अवमानप्रकरणी निषेध नोंदवणाऱ्या देशांची संख्या १२ वर पोहोचली आहे.
कतार, इराण, कुवेतपाठोपाठ आता संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांनाही या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली. यामध्ये सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, जॉर्डन, ओमान, पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक जारी केले आहे. ज्या गोष्टी नैतिक मुल्यांच्या आणि सिद्धांतांच्याविरोधात आहेत त्याला आम्ही विरोध करतो. सर्व धार्मिक प्रतीकांचा सन्मान केला गेला पाहिजे. द्वेषपूर्ण वक्तव्य पूर्णपणे हद्दपार केली पाहिजेत. एखाद्या धर्माच्या अनुयायांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य करता कामा नये, अशी अपेक्षा संयुक्त अरब अमिरातीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ही टीका स्वीकारण्यासारखी नाही
सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणाऱ्या इंडोनेशियानेसुद्धा प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. ही टीका स्वीकारण्यासारखी नाही, असे इंडोनेशियाने म्हटले असून, एक पत्रक जारी करत याची एक प्रत भारतीय दुतावासाला पाठवण्यात आली आहे. दुसरीकडे, मालदीवच्या संसदेमधील विरोधी पक्षाने गोंधळ घातल्यानंतर तेथील सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मोदी सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
दरम्यान, बांगलादेशने या प्रकरणावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. बांगलादेशप्रमाणे मलेशिया आणि इराकनेही यासंदर्भात अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दुसरीकडे, विशिष्ट धर्माविषयी काही लोकांनी केलेली वक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. सरकारची ती भूमिका नाही. भारतात सर्व धर्मांचा आदर केला जातो. त्यामुळे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) केलेली टीका संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडवते, अशी खरमरीत प्रतिक्रिया केंद्र सरकारतर्फे देण्यात आली.