भाजपा आणि एमआयएम यांच्यात ‘नुरा कुस्ती’

By admin | Published: March 17, 2016 12:38 AM2016-03-17T00:38:06+5:302016-03-17T00:38:06+5:30

भाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत

'Nura wrestling' between BJP and MIM | भाजपा आणि एमआयएम यांच्यात ‘नुरा कुस्ती’

भाजपा आणि एमआयएम यांच्यात ‘नुरा कुस्ती’

Next

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
भाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत काँग्रेसने बुधवारी ‘वंदेमातरम्’ आणि ‘भारत माता की जय’वरून या दोन्ही पक्षांवर शरसंधान केले.
‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हटले पाहिजे असे भारतीय राज्यघटना किंवा अन्य कोणत्याही नियमावलीत लिहिलेले नाही. परंतु हा नारा स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मनाच्या अभिव्यक्तीच्या रूपात पुढे आला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशाप्रति सन्मान आणि समर्पण भाव व्यक्त करण्यासाठी ‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ हे नारे बुलंद करण्यात आले, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे. ‘कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही’, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेत म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ शमताना दिसत नाही. लेखक आणि खासदार जावेद अख्तर यांनी मंगळवारी ‘भारत माता की जय’ म्हणत ओवैसी यांना प्र त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. ‘कुणाच्या सांगण्यावरून नारा देऊन मला माझी देशभक्ती सिद्ध करावी लागेल काय? असे केलेच पाहिजे हे कोणत्या कायद्यात लिहिले आहे? मी खासदार आहे, मी संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि मी संसदेत हजर राहतो. मी संविधानाच्या व्यवस्थेशी बांधील आहे. तरी आमच्या देशभक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे,’ असे ओवैसी म्हणाले होते.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या पुस्तकाचा उल्लेख करताना सिंघवी म्हणाले, या देशाचे लोक, वृक्ष, जंगल, पर्वत, नद्या हे सर्वच भारत माता आहेत. कारण याच धरतीवर हे सर्वकाही विद्यमान आहे. हा देशासाठी समर्पित नारा आहे आणि त्याचा उच्चार करण्यात वाईट काही नाही. उलट हा नारा बुलंद करताना आम्हाला अभिमान वाटतो. परंतु ओवैसी, गिरिराज सिंग, साक्षी महाराज, आजम खान आणि शफिक-उ-रहमान यांच्यासारखे लोक मात्र केवळ ध्रुवीकरणासाठी आणि राजकीय फायदा उकळण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून द्वेष पसरविण्याचे काम करीत आले आहेत.

समाज विभाजन करण्याचा प्रयत्न
निवडणुका जवळ आल्या की हे लोक समाज तोडण्याच्या आपल्या कारवायांना गती देतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत याचा अनुभव आला आहे आणि आता पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुका पाहूनच भाजपा आणि एमआयएमने एकत्र येऊन ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला.

Web Title: 'Nura wrestling' between BJP and MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.