कपडे, चप्पल जळाली तरी...; झाशी रुग्णालयात 'त्या' नर्सने १५ बालकांना दिलं जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:46 PM2024-11-18T17:46:45+5:302024-11-18T17:50:10+5:30

झाशीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत १० नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Nurse Megha risked her life and saved 15 children in the Jhansi hospital fire | कपडे, चप्पल जळाली तरी...; झाशी रुग्णालयात 'त्या' नर्सने १५ बालकांना दिलं जीवनदान

कपडे, चप्पल जळाली तरी...; झाशी रुग्णालयात 'त्या' नर्सने १५ बालकांना दिलं जीवनदान

Jhansi Hospital Fire :  उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत १० नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात ही घटना घडली. परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटलं जात आहे. अशातच तिथल्याच एका परिचारिकिने आपला जीव धोक्यात घालून १५ बालकांचा जीव वाचवला आहे.

उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये १५ नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या घटनेत १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक गंभीररित्या भाजले आहेत. ज्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या आगीतून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र या मुलांनाही बाहेर काढण्यासाठी लोकांना जीव धोक्यात घालावा लागला. तसेच ड्युटीवर असलेल्या नर्स मेघा यांनीही आपला जीव धोक्यात घालून मुलांचे प्राण वाचवले आणि १५ निरागस बालकांना जीवनदान दिलं.

नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाने पेट घेतल्यानंतर नर्स मेघा यांनी दाखवलेल्या धैर्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. मेघा यांनी लोकांची मने जिंकली. १५ नवजातांचे प्राण वाचवल्यामुळे मेघा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मेघा जेम्स यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निष्पाप लोकांचे प्राण वाचवले.

आग लागली तेव्हा मेघा जेम्सही तिथे हजर होत्या. मी एका मुलाला लस देण्यासाठी सिरिंज आणायला गेले होते. जेव्हा ती परत आली तेव्हा पाहिले की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरला आग लागली होती. ताबडतोब वॉर्ड बॉयला बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. माझ्या चप्पलला आग लागली त्यामुळे माझा पाय भाजला. मग माझ्या सलवारला आग लागली. मी माझी सलवार काढली आणि फेकली. त्यावेळी माझा मेंदू जवळजवळ काम करत नव्हता. मी दुसरी सलवार घातली आणि मुलांचे प्राण वाचवायला सुरुवात केली, असे मेघा जेम्स यांनी सांगितले.

दिवे बंद केले नसते तर आणखी मुलांना वाचवता आले असते. हे सर्व अगदी अचानक घडले. आमच्यापैकी कोणालाही याची अपेक्षा नव्हती, असेही मेघा म्हणाल्या. सहाय्यक नर्सिंग अधीक्षक नलिनी सूद यांनी जेम्स यांच्या शौर्याचे कौतुक केले. "बाळांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एनआयसीयू वॉर्डच्या काचा फोडल्या. त्यानंतर नर्स मेघाच्या सलवारला आग लागली. स्वतःच्या सुरक्षेची काळजी न करता त्या मुलांना वाचवण्यासाठी तिथेच थांबल्या आणि अर्भकांना बाहेरच्या लोकांच्या ताब्यात दिले," असे नलिनी सूद यांनी सांगितले. सध्या मेघा जेम्स यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Nurse Megha risked her life and saved 15 children in the Jhansi hospital fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.