धक्कादायक ! 'थ्री इडियट्स' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरांशी फोनवर बोलत डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 04:18 PM2017-10-04T16:18:09+5:302017-10-04T16:20:03+5:30
ओडिसामधील केंद्रपाडा येथील साई हॉस्पिटलमध्ये 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीनप्रमाणे डॉक्टरांशी फोनवर बोलत महिलेची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुर्खपणामुळे बाळाचा मात्र जन्माआधीच दुर्देवी मृत्यू झाला.
भुवनेश्वर - ओडिसामधील केंद्रपाडा येथील साई हॉस्पिटलमध्ये 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीनप्रमाणे डॉक्टरांशी फोनवर बोलत महिलेची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुर्खपणामुळे बाळाचा मात्र जन्माआधीच दुर्देवी मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली.
आरती समल यांना प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर त्यांचे पती कल्पतरु समल यांनी त्यांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे गेल्यावर वरिष्ठ डॉक्टर रश्मीकांत पात्रा रुग्णलायत उपस्थित नसल्याचं त्यांना कळलं. कल्पतरु यांनी रश्मीकांत पात्रा यांना फोनवरुन संपर्क साधला. यावेळी रश्मीकांत पात्रा यांनी नर्स डिलिव्हरी करतील असं सांगत कल्पतरु यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नाजूक असल्याने तसंच त्यावेळी लगेच दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कल्पतरु समलदेखील नर्सकडून डिलिव्हरी करुन घेण्यास तयार झाले.
रुग्णालयाच्या नर्स टीमने डॉ रश्मीकांत यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधत आरती यांच्यावरील ऑपरेशनला सुरुवात केली. पण याचा परिणाम असा झाला की, बाळाचा जन्माआधीच मृत्यू झाला. इतकंच नाही तर आरती यांच्या गर्भाशयालाही इजा झाली. डॉक्टर आणि नर्सेसच्या निष्काळजीपणामुळे फक्त बाळाचा मृत्यू झाला नाही, तर आरती यांच्या गर्भाशयलाही हानी पोहोचली आहे.
यानंतर कल्पतरुन आपल्या नवजात बाळाचा मृतदेह घेऊन केंद्रपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. कल्पतरु यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कल्पतरु यांनी सांगितलं आहे की, 'जेव्हा आम्ही डॉक्टर रश्मिकांत पात्रा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आरती यांना रुग्णालयात दाखल करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं की, मी रुग्णालयात उपस्थित नाहीये, पण नर्सेससोबत को-ऑर्डिनेट करेन'. डॉक्टर रश्मिकांत पात्रा यांनी विश्वास ठेवायला सांगितल्याने पत्नीला रुग्णालयात भर्ती केलं होतं असं कल्पतरु बोलले आहेत.
सध्या पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.