Uday Lalit : महाराष्ट्रासाठी आज दुसऱ्यांदा सोनेरी दिवस; कोकणचे सुपूत्र उदय लळीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 09:34 AM2022-08-27T09:34:08+5:302022-08-27T09:37:43+5:30
Oath Ceremony Of New CJI Uday Lalit: देशाच्या न्यायदेवतेच्या सर्वोच्च संस्थेची धुरा महाराष्ट्राचा सुपूत्र सांभाळणार आहे. महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ते ४९ वे सरन्यायाधीश असणार आहेत.
महाराष्ट्रासाठी आजचा आणखी एक सोनेरी दिवस उजाडला आहे. देशाच्या न्यायदेवतेच्या सर्वोच्च संस्थेची धुरा महाराष्ट्राचा सुपूत्र सांभाळणार आहे. न्यायमूर्ती उदय लळीत हे आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ते ४९ वे सरन्यायाधीश असणार आहेत. अडीच महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील महत्वाचे एकनाथ शिंदे-ठाकरे शिवसेना वादाचे प्रकरणाची मुख्य जबाबदारी त्यांना हाताळावी लागणार आहे. लळीत यांच्यानंतर ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्या. डी वाय चंद्रचूड हे शपथ घेतील. रमणा यांच्यापूर्वी नागपूरचे शरद बोबडे हे सरन्यायाधीश होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातून सरन्यायाधीश पदावर नियुक्त होणारे लळीत हे दुसरे आहेत.
राष्ट्रपती मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. त्यांचा कार्यकाळ अवघा ७४ दिवसांचा असेल. १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील.
कोकणचे सुपुत्र !
न्या. उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.