ओबामांचे मोदींना निमंत्रण
By admin | Published: July 12, 2014 01:51 AM2014-07-12T01:51:41+5:302014-07-12T01:51:41+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे औपचारिक निमंत्रण दिले असून, मोदी यांनी ते स्वीकारत आपण सप्टेंबर महिन्यात अमेरिकेला भेट देऊ असे म्हटले आहे.
Next
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे औपचारिक निमंत्रण दिले असून, मोदी यांनी ते स्वीकारत आपण सप्टेंबर महिन्यात अमेरिकेला भेट देऊ असे म्हटले आहे. मोदी यांची भेट घेऊन भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्याचा विचार ओबामा यांनी मांडला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या निमंत्रणाबद्दल ओबामा यांचे आभार मानले असून, सप्टेंबर महिन्यात आपण अमेरिकेला भेट देऊ व या भेटीतून ठोस निष्कर्ष हाती येतील असे म्हटले आहे. तसेच भारत व अमेरिका यांच्या मैत्रीला या भेटीतून ऊर्जा व चालना मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
ओबामा यांचे निमंत्रणाचे पत्र उप परराष्ट्रमंत्री विल्यम बर्न्स यांनी नरेंद्र मोदी यांना दिले. बर्न्स आज पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी आले होते. या पत्रत ओबामा म्हणतात, मोदी यांच्या अमेरिका भेटीची आपण वाट पाहत आहोत. या भेटीत भारत व अमेरिका यांच्यातील मैत्रीला 21 व्या शतकाच्या खास भागीदारीचे स्वरूप देता येईल. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
मोदी यांनी यावेळी ओबामा यांनी केलेल्या अभिनंदनाची आठवण केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ओबामा यांनी फोनवर त्यांचे अभिनंदन केले होते. तसेच विस्तृत पत्र पाठवून आज निमंत्रण दिले, त्याचेही कौतुक मोदी यांनी केले आहे.
उप परराष्ट्रमंत्री बर्न्स व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, अमेरिकेच्या दूत कॅथलिन स्टीफन्स व अमेरिकेच्या दक्षिण व मध्य आशियाच्या सहायक परराष्ट्रमंत्री निशा बिस्वाल हे उपस्थित होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4भारत व अमेरिका यांच्यातील मैत्रीच्या नात्याला नवी ऊर्जा मिळाल्यास त्यातून दक्षिण आशियाचा परिसर व संपूर्ण जगाला संदेश दिला जाईल, असे मोदी यांना वाटते. भारत व अमेरिका हे दोन मोठे लोकशाही देश आहेत.
4या दोन देशांच्या मैत्रीचा फायदा उभय देशांपुरताच राहू नये, तर जागतिक पातळीवर तो शांततेचा, स्थैर्य व समृद्धीचा प्रभावी स्रोत ठरावा, असे मोदी यांनी म्हटले आहे.