नवोदयमध्ये ओबीसींना मिळतील राखीव जागा!
By admin | Published: January 18, 2017 05:11 AM2017-01-18T05:11:12+5:302017-01-18T05:11:12+5:30
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा नसणे
नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा नसणे हे नियमांविरुद्ध आहे व ही त्रुटी नजीकच्या काळात दूर केली जाईल, असे या खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी सांगितले.
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जवळपास ६०० जवाहर नवोदय विद्यालयांत राखीव जागांची तरतूद लागू न करणे हे योग्य नाही, असे मला जाणवले. ही त्रुटी दूर केली जाईल, असे कुशवाह यांनी येथे राष्ट्रीय सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात बोलताना सांगितले. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर या वेळी उपस्थित होते. कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष असून, तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका येत्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार असून, कुशवाह यांच्यावरील विधानाचे महत्त्व त्या पार्श्वभूमीवर आहे. जावडेकर म्हणाले की, नवोदय विद्यालयांतील प्रवेश या वर्षी स्पर्धा परीक्षांद्वारे झाले. २२ लाख मुलांनी त्यासाठी अर्ज केला होता. त्यातून ४० हजार मुलांची निवड झाली. अनुसूचित जातींसाठी या विद्यालयांत कमी राखीव जागा असल्या, तरी या वर्गांतील विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्के आहे. अनुसूचित जमातींसाठी सात टक्के राखीव जागा असून, १९ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. जात, पंथ निकषांवर आलेले नसून, या विद्यार्थ्यांनी निव्वळ गुणवत्तेवर प्रवेश मिळवले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>निसर्गाने भेदभाव केलेला नाही...
जवाहर नवोदय विद्यालयांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांमधील गुणांत फार काही मोठा फरक नाही, असे जावडेकर म्हणाले. निसर्गाने जातीचा आधार घेऊन बुद्धी देताना भेदभाव केलेला नाही हे आम्ही समजून घ्यायला हवे.प्रत्येक जण बुद्धीमान असून, कोण संधी घेतो आणि कोण कठोर परिश्रम करतो हा प्रश्न आहे. सगळ््यांना संधी उपलब्ध झाली पाहिजे यावर जावडेकर यांनी भर दिला. २०१७ यावर्षात मोदी सरकारने ६२ नव्या जवाहर नवोदय विद्यालयांची घोषणा केल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.