५४६ मुलींचे अश्लील व्हिडीओ, तो कॅफे अन् महाराष्ट्र कनेक्शन... वाराणसी गँगरेप प्रकणात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:27 IST2025-04-13T16:26:04+5:302025-04-13T16:27:17+5:30
वाराणसी अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाइलमध्ये ५४६ मुलींचे नग्न व्हिडीओ सापडले

५४६ मुलींचे अश्लील व्हिडीओ, तो कॅफे अन् महाराष्ट्र कनेक्शन... वाराणसी गँगरेप प्रकणात धक्कादायक माहिती उघड
Varanasi Gang Rape Case:वाराणसी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या १२ आरोपींच्या मोबाइलमध्ये ५४६ मुलींचे नग्न व अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. ज्या मोबाइलवर हे व्हिडीओ शेअर केले आहेत, त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये आढळून आले आहे. हे सर्व व्हिडीओ या प्रकरणातला मास्टरमाईंट अनमोल गुप्ता यांच्या मालकीच्या कॅफेमध्ये तयार करण्यात आल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून कॅफे सील करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचले आहेत.
वाराणसीत १९ वर्षीय विद्यार्थिनीवर सात दिवसांत २३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला अंमली पदार्थ दिला आणि तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या २३ पैकी १२ मुलांचे मोबाईल तपासले तेव्हा ५४६ मुलींचे नग्न व्हिडिओ आणि फोटो सापडले. त्यांनी हे व्हिडीओ उत्तर प्रदेशसह ६ राज्यांमध्ये विकले गेल्याचे समोर आलं आहे. उत्तर प्रदेशसह दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हे व्हिडीओ पाठवण्यात आले आहेत.
या घटनेतील प्रमुख सूत्रधार व कांटिनेटल कॅफेचा मालक अनमोल गुप्ता हा उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मुलींचे व्हिडीओ पाठवत होता. गुप्ताच्या आयफोनमध्येही मुलींचे अश्लील व्हिडीओ आढळून आले. यातील बहुतांश व्हिडीओ कांटिनेटल कॅफेमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेरातून शूट करण्यात आले होते. अनमोल हे नग्न फोटो आणि व्हिडिओ त्याच्या ग्राहकांना पाठवत होता आणि नवीन ग्राहक तयार करत होता. अनमोलच्या मोबाईल फोनमध्ये एक डेटाशीट देखील सापडली आहे.
तपासादरम्यान,अनमोलने पोलिसांना सांगितले की त्याचे वडील शरद गुप्ता देखील सेक्स रॅकेटचा भाग आहेत. २०२२ मध्ये अनमोलला त्याचे वडील शरद गुप्ता यांच्यासह सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. अटक केलेले १२ ही आरोपी अंमली पदार्थांचे व्यसनी असल्याचे समोर आलं आहे. ड्रग्जच्या व्यसनामुळे यापूर्वी ही ते तुरुंगात जाऊन आले आहेत.