पासपोर्ट मिळविणे, परदेशवारी करणे मूलभूत अधिकार
By admin | Published: July 14, 2014 12:52 AM2014-07-14T00:52:18+5:302014-07-14T00:52:18+5:30
आपल्या नावाने पासपोर्ट मिळविणे आणि परदेश वारी करणे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार असल्याचा निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला
नवी दिल्ली : आपल्या नावाने पासपोर्ट मिळविणे आणि परदेश वारी करणे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार असल्याचा निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. सोबतच तीनवेळा पासपोर्ट हरवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पासपोर्ट देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.
याचिकाकर्ता ए. विकास यांना पुन्हा पासपोर्ट देण्यात यावे, असे न्या. मनमोहन यांच्या पीठाने परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित कार्यालयाला निर्देश दिले. तसेच याचिकाकर्त्याने आपला पासपोर्ट सांभाळण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल ५० हजार रुपये लोकनायक जयप्रकाश नारायण इस्पितळाला दान करावे, असे न्यायालय म्हणाले.
याचिकाकर्त्याचा भाऊदेखील आॅस्ट्रेलियात स्थायिक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत याचिकाकर्त्याला पासपोर्ट देण्यात न आल्यास त्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होईल, असेही न्यायालय म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)