प्रसंगी भाजपाशीही हातमिळवणी करेन, जनतेसाठी चित्रपटसृष्टी सोडू - कमल हसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:09 AM2017-09-27T01:09:07+5:302017-09-27T01:09:29+5:30
तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते कमल हसन यांनी प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण चित्रपटसृष्टीही सोडू, असेही त्यांनी म्हटले आहे.
चेन्नई : तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते कमल हसन यांनी प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण चित्रपटसृष्टीही सोडू, असेही त्यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत कमल हसन यांनी ही विधाने केली. ते म्हणाले की, जर माझ्या विचारांच्या विरोधात जाण्याची शक्यता नसेल आणि चांगले प्रशासन हा मुद्दा असेल, तर काही तडजोडी करण्यास आपली तयारी आहे. तुम्हाला राज्याच्या भल्याचा विचार करावा लागतो. त्यांना (भाजपाला) माझी विचारधारा योग्य वाटते की नाही, हे मला माहीत नाही. राजकारणात जर लोकांचे भले करायचे असेल, तर कोणाला अस्पृश्य मानून चालणार नाही. तुम्ही राजकीय पक्ष उभारण्याचा निर्णय घेण्याचा विचार करीत आहात का, असे विचारता ते म्हणाले की, तो विचार डोक्यात आहे. पक्ष उभारणे हा खूपच मोठा निर्णय असतो. (वृत्तसंस्था)
आधीच दिले होते संकेत
या आधीही त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मी कोणाशीही युती करणार नाही. प्रसंगी मी एकटाच पुढे जात राहीन, असे कमल हसन म्हणाले होते. त्या वेळी त्यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, पेरियार रामस्वामी नायकर यांचीही नावे घेतली होती.