नवरात्रीनिमित्त गरबा खेळण्यासाठी आलेल्यांचं गोमूत्र शिंपडून करण्यात आलं शुद्धीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 06:27 PM2017-09-23T18:27:34+5:302017-09-23T18:30:28+5:30
गरबा खेळण्यासाठी आलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे
अहमदाबाद - गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आयोजित थनगनाट गरबा महोत्सवात ही घटना घडली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचं गोमूत्र शिंपडून आणि नाम ओढून स्वागत करण्यात आलं.
सहभागी झालेल्या लोकांनी सांगितल्यानुसार, शुक्रवारी बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ता जवळपास 25 मिनिटं कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. हे कार्यकर्त बाहेर थांबले होते. मात्र याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
बजरंग दलाचे कार्यकर्ता सुर्यप्रकाश वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही गांधीनगर आणि आसपासच्या परिसरात लव्ह जिहाद विरोधात महिलांना जागरुक करण्यासाठी फिरत आहोत. स्वागतासाठी गोमूत्राचा वापर करणे आणि नाम ओढण्याची परंपरा पुन्हा रुजावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत'.
गरबा महोत्सवाचे आयोजक संदीप जोशी यांनी सांगितलं आहे की, बजरंग दलाने आधीच आम्हाला यासंबंधी कल्पना दिली होती, आणि यामध्ये काहीही चुकीचं नाही. दुसरीकडे गरब्यात सहभागी झालेल्या साक्षी परमार या तरुणीचं म्हणणं आहे की, आपली परंपरा, संस्कृती गोमूत्राचा वापर शिकवते, आणि मला यामध्ये काहीच त्रास नाही.
गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती
नवरात्र उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली होती. गरबामध्ये अनेकदा हिंदू नसलेली लोकं येतात व ते हिंदू मुलींनी स्वतःकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात, असे समितीचे म्हणणे होते. एकूणच गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळू नये, यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्याची बाब संस्थेचं अध्यक्ष कैलास बेगवानी यांनी मान्य केली होती. भोपळमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत संस्थेनं गरबामध्ये आधार कार्ड सक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती.