प्रसंगी काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा
By Admin | Published: January 9, 2015 02:06 AM2015-01-09T02:06:25+5:302015-01-09T02:06:25+5:30
दिल्लीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास आम आदमी पार्टीला(आप) पुन्हा पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी असेल, असे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : दिल्लीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास आम आदमी पार्टीला(आप) पुन्हा पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी असेल, असे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी स्पष्ट केले.
आम्हाला स्थिर सरकार हवे असून गरज भासल्यास जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमची ‘आप’ला पाठिंबा देण्याची तयारी असेल, असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे कॉंग्रेसने दीक्षित यांच्या विधानाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दीक्षित यांचे ते वैयक्तिक मत असू शकते, असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मुकेश शर्मा यांनी स्पष्ट केले.
आपसोबत युती करण्याची काँग्रेसची इच्छा आहे काय, असे दीक्षित यांना विचारण्यात आले असता त्यांनी तशी शक्यता फेटाळून लावली. दरम्यान आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी दीक्षित यांच्या विधानाची टर उडविली.
दिल्लीतील ७० जागांपैकी एकही जागा काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्हाला स्वबळावर सत्तेवर येण्याचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता पाहता राजकीय पक्षांनी दिल्लीत प्रचाराला सुरुवात केली आहे.
पाठिंबा ना देऊ ना घेऊ
आम्ही कधीही आम आदमी पार्टीला पाठिंबा देणार किंवा घेणार नाही. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेची फसवणूक केली आहे. ही जनता त्यांना पुन्हा संधी देणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसला विजयाचा विश्वास आहे, असे मुकेश शर्मा
यांनी म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ८ जागा मिळाल्याने १५ वर्षांपासूनची राजवट संपुष्टात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अल्पमतातील सरकार स्थापन केले होते.