मानवी हस्तक्षेपामुळे महासागर धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:32 AM2020-06-08T05:32:35+5:302020-06-08T05:32:42+5:30

महासागर दिनानिमित्त खास मुलाखत : शास्त्रज्ञ डॉ. एम.आर. रमेशकुमार यांचे मत

Ocean threatened by human intervention | मानवी हस्तक्षेपामुळे महासागर धोक्यात

मानवी हस्तक्षेपामुळे महासागर धोक्यात

Next

राजू नायक

पणजी : पृथ्वीचा ७१ टक्के भाग महासागरांनी व्यापलेला असून, या ग्रहावरील ९७ टक्के पाणी या महासागरात सापडते. यातले एकतृतीयांश द्रवरूपात, तर उर्वरित दोनतृतीयांश हिमनग आणि धृवीय हिमावरणाच्या रूपात असते. या महासागरांचे पृथ्वीतलासाठी आणि भारतासाठी काय महत्त्व आहे, हे जाणून घेण्यासाठी दोनापावला- गोवा येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतले शासत्रज्ञ डॉ. एम.आर. रमेशकुमार यांच्याशी वार्तालाप केला, त्याचा हा गोषवारा.

महासागराची उपयुक्तता कशी विशद कराल?
महासागरांचे अस्तित्व भूपृष्ठीय पर्यावरणासाठी अनन्यसाधारण मानले गेलेय. आपल्या देशाला मान्सूनच्या पावसाचे वरदान लाभलेय. येथे येणाऱ्या प्रत्येक मान्सूनची तीन वैशिष्ट्ये आहेत. त्याचे केरळच्या किनाºयावरील आगमन, पर्जन्यकाळातील वृष्टीचे आरोह- अवरोह आणि पावसाचे देशभरातील विविध प्रमाणात पडणे. या सगळ्यांवर महासागरांतील घडामोडींचा प्रभाव असतो.
महासागरांना मानवी व्यवहारांपासून कोणते धोके संभवतात?
समुद्राच्या पाण्याचे ८० टक्के प्रदूषण जमिनीवरील मानवी व्यवहारांतून होत असते.ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रगर्भातल्या प्रक्रिया बदलत असून, पाण्याच्या तापमानवाढीमुळे अनेक प्रजातींसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे.
या समस्यांचे समाधान काय?
समुद्री जैववैविध्याच्या रक्षणासाठी मरीन पार्क्स स्थापन करणे, ट्रॉलिंगसारख्या विघातक मासेमारीच्या पद्धती बंद करणे, देवमाशांच्या जिवावर उठलेल्या नौदलांच्या सोलार यंत्रणेचा वापर कमी करणे, पारंपरिक मत्स्यव्यावसायिकांना उत्तेजन देत संवर्धनाच्या कार्यक्रमात सामावून घेणे, हे तातडीचे उपाय आहेत.
आपल्या महासागरांना असलेले अन्य धोके कोणते?
वातावरण बदल हा महत्त्वाचा व फार मोठा धोका. त्यामुळे पाणी तापू लागले असून, त्यातील आम्लाचे प्रमाण वाढते आहे. यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन समुद्री जिवांना श्वास घेताना त्रास होतो. दुसरा धोका आहे, तो प्लास्टिक प्रदूषणाचा.
संरक्षित समुद्रीक्षेत्राची कल्पना स्पष्ट कराल का?
जशी आपल्याकडे अभयारण्ये असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण प्राण्यांच्या प्रजातींचे रक्षण करतो तद्वतच आपण समुद्रसपाटीखाली संरक्षित समुद्रक्षेत्र तयार करायचे असते. तेथे मत्स्यजीवनाला अभय असते.
समुद्रगर्भात खनिजेही असतात का?
हो तर! खोल समुद्रात मँगनिजचे साठे आहेत. त्यातील तांबे, निकेल आणि कोबाल्टचे लक्षणीय प्रमाण या साठ्यांना अमूल्य बनवते. मँगनिजचे गोळे जेमतेम १० सेंटीमीटर आकाराचे असतात आणि त्यांचा आकार १ ते ३ मिलीमीटरने वाढण्यास तब्बल १० लाख वर्षे लागतात.
समुद्रातील जैववैविध्याविषयी सांगाल?
असे मानतात की आजपर्यंत आपण बॅक्टेरिअल प्लँकटनविषयी जेमतेम ०.१ % माहिती प्राप्त केली आहे. एका अंदाजानुसार समुद्राच्या पोटात पाच लाख ते एक कोटी प्रजातींचे वास्तव्य असावे.
या जैववैविध्याला कोणते धोके संभवतात?
सर्वाधिक धोका आहे, तो प्रवाळांना. प्रवाळ समुद्रांच्या आम्लीकरणाबाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्राणवायूची मात्रा कमी झाल्यावर आम्लाची मात्रा वाढते. शिवाय पाण्याचे तापमानही वाढते. या सर्व प्रक्रियांमुळे आज ६० टक्के प्रवाळांसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. हे प्रमाण २०३० पर्यंत ९० टक्क्यांवर जाणार असून, २०५० पर्यंत १०० टक्के प्रवाळ नामशेष होऊ शकतात. दुसरा धोका आहे तो कांदळवनांना. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्जांचा टप्पा ओलांडणार असल्याने हा ताण किती वाढेल याची कल्पनाच करवत नाही.

जागतिक महासागर दिनाचे महत्त्व काय?
१९९२ साली कॅनडात झालेल्या महासागरविषयक शिखर परिषदेत ८ जून महासागर दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला २००८ साली संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली. यंदाच्या जागतिक महासागर दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे ‘स्वयंपोषक महासागरासाठी कल्पकतेचा वापर.’

Web Title: Ocean threatened by human intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.