कोणत्याही व्हिसावर भारतीय जातील आता अमेरिका, जर्मनी, इंग्लड आणि फ्रान्सला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:07 AM2020-08-11T07:07:48+5:302020-08-11T07:07:53+5:30
आतापर्यंत फक्त या देशांमध्ये स्पेशल रेसिडेन्सी स्टेटस असलेल्या किंवा दीर्घ मुदतीच्या वास्तव्यासाठीच्या व्हिसासाठी निवडलेल्या नागरिकांनाच जाण्याची परवानगी होती.
नवी दिल्ली : नागरी उड्डयन मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियम आणखी शिथील केल्यामुळे भारतीय नागरिकांना अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्सला आता कोणत्याही प्रकारच्या व्हिसावर जाता येईल.
आतापर्यंत फक्त या देशांमध्ये स्पेशल रेसिडेन्सी स्टेटस असलेल्या किंवा दीर्घ मुदतीच्या वास्तव्यासाठीच्या व्हिसासाठी निवडलेल्या नागरिकांनाच जाण्याची परवानगी होती.
केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रवासाची प्रक्रिया आणखी सोपी केली. त्यानुसार वंदे भारत मिशनच्या पाचव्या टप्प्यात ओव्हरसीज सिटिझनशिप आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना भारतात प्रवास करता येईल. कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने व्हिसावर बंधने घातली होती. नियम शिथील झाल्यानंतर ओव्हरसीज सिटिझन्स आॅफ इंडिया आणि विशिष्ट वर्गांतील विदेशींना भारतात प्रवास करता येईल. मात्र त्यासाठी भारताचा त्या देशांबरोबर ‘एअर बबल अॅग्रिमेंट’ झालेला असणे गरजेचे आहे. या करारामुळे दोन देशांत व्यावसायिक उड्डाणांची वाहतूक सहजपणे होते. भारताचा असा करार अमेरिका, इंग्लड, जर्मनी आणि फ्रान्ससोबत झालेला आहे.
काय आहे नियम?
कराराचा उल्लेख करून गृह मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, ‘‘सगळ्या ओसीआय कार्डधारकांना (ज्यांच्याकडे अशा देशांतील पासपोर्टसही आहे) भारतात प्रवेश दिला जाईल. या आदेशाने अशा देशांचा कोणत्याही प्रकारचा वैध व्हिसा असलेल्या भारतीय नागरिकांनाही त्या देशात प्रवेश करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्या देशामध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश बंदी नसली पाहिजे.’’