आॅक्टोबर हीट, त्यात पायपीट
By admin | Published: October 10, 2014 03:04 AM2014-10-10T03:04:50+5:302014-10-10T03:04:50+5:30
मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना निवडणुकीचा रंगही चढलेला दिसून येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास उमेदवार अनेक शक्कल लढवत आहेत.
मनीषा म्हात्रे, मुंबई
मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना निवडणुकीचा रंगही चढलेला दिसून येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास उमेदवार अनेक शक्कल लढवत आहेत. मात्र आॅक्टोबर हीटमुळे उमेदवारांपुढे डोंगराळ भागातील पायपीट त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. त्यातही बहुतांश डोंगराळ भाग असलेल्या उत्तर पूर्व मुंबईमधील मतदारसंघातील उमेदवारांना याची जास्त झळ बसत आहे.
उत्तर पूर्व मुंबईमध्ये मुलुंड ते घाटकोपर या भागातील ४० टक्के मतदार हा डोंगराळ परिसरात राहतो. हा मतदार विकासापासून मोठ्या प्रमाणात वंचित आहे. उदाहणार्थ मुलुंडमधील न्यू राहुल नगर, हनुमान पाडा, शंकर टेकडी, उदय नगर, पंंचशील नगर, भांडुप टेभीपाडा, रमाबाई नगर, विक्रोळी पार्कसाइट, फुले नगर-घाटकोपर, असल्फा व्हिलेज अशा अनेक भागांमध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्याही, परंतु विकासाची गंगा मात्र काही पोहोचलीच नाही. इथला मतदार अजूनही दुर्लक्षितच आहे. वीज- पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासूनही अनेक कुटुंबे वंचित आहेत. यंदाच्या पंचरंगी लढतीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मतविभागणीमुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. एरवी डोंगराळ भागाच्या उंचवट्यावर राहणाऱ्या मतदारांकडे ढुंकूनही न बघणारे राजकीय नेते सध्या या भागात धापा टाकत पायपीट करताना दिसत आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी उन्हाच्या उकाड्यात डोंगराळ भागातील प्रचार सर्वात जास्त त्रासदायक ठरत आहे. त्यातच त्यांचा जास्त वेळ जात असल्याचे दिसते. बहुतेक उमेदवार सायंकाळच्या वेळेत या ठिकाणी प्रचार करण्यावर भर देताना दिसत आहे. मात्र, उमेदवाराने कितीही पायपीट केली, तरी जो आमच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल त्यालाच आम्ही मतदान करणार असल्याचे डोंगराळ भागात राहणाऱ्या मतदारांचे म्हणणे आहे.